आषाढी एकादशीनिमित्त जिव्हाळा सेवाश्रमात भक्तिरसाची अवीट मैफल

श्री देवी माऊली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या भजन-गायनाने वातावरण झाले भक्तिमय

कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमात आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या भजन व गायन कार्यक्रमाने संपूर्ण सेवाश्रम परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला. शनिवारी (दि. २५ जुलै) झालेल्या या कार्यक्रमात चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथील विद्यार्थ्यांनी सुरेल भजने, अभंग आणि भक्तिगीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
विद्यालयाचे संगीत शिक्षक योगेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भक्तिगायनाला जिव्हाळा सेवाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, लाभार्थी तसेच उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरभरून दाद दिली. संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.
यावेळी २२ जुलै रोजी वाढदिवस झालेल्या संगीत शिक्षक योगेश प्रभू यांचा सेवाश्रमाचे अध्यक्ष सुरेश बिर्जे यांच्या हस्ते औक्षण करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच सौ. शोभा बिर्जे यांचाही वाढदिवस औक्षण करून लाभार्थ्यांना खाऊ वाटप करत आनंदात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रकाश प्रभू यांनी केले, तर गायन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अवनी शृंगारे हिने प्रभावीपणे पार पाडले. बुवा श्रीशा राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पखवाजावर श्रेयस राणे, तबल्यावर सार्थक जामदार आणि भावीक मेस्त्री यांनी वाद्यसाथ दिली. कोरस गायनात अवनी शृंगारे, आराध्या मार्गी, लेखा मेस्त्री, भक्ती परब, गौरी मसुरकर, सिद्धीका नाईक, लावण्या परब, ऐंजेल वर्देकर, जुई राऊळ, भावी राऊळ, प्राची राऊळ आणि हर्षीदा तोरकर यांनी सहभाग घेतला. हार्मोनियमवर सोहम नाईक, शिवम मेस्त्री आणि सोहम टुंबरे यांनी साथ केली, तर जुई राऊळ हिनेही गायन सादर केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य अरुण परब, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बिर्जे, सचिव संदीप बिर्जे, गीतांजली बिर्जे, श्रेया बिर्जे, विद्यालयाचे शिक्षक संतोष सांगळे तसेच पालक प्रकाश राणे, स्वाती राणे, दिनेश मेस्त्री, सदानंद मेस्त्री, अनिता वर्देकर, समीर मसुरकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी जिव्हाळा सेवाश्रमाच्या वतीने संगीत शिक्षक योगेश प्रभू आणि सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानण्यात आले. या भक्तिमय कार्यक्रमामुळे सेवाश्रम परिसरात आनंद, श्रद्धा आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

error: Content is protected !!