जिल्ह्यात उत्तम आरोग्य सेवेसाठी प्रयत्न – पालकमंत्री

नेरूर येथील महाआरोग्य शिबिराचा १२८९ रुग्णांनी घेतला लाभ
बेळगाव येथील के.एल्.ई. रुग्णालयातही होणार उपचार
सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य सेवेत स्वयंपूर्ण व्हावा. येथेच जिल्हावासियांना चांगली आरोग्य सेवा मिळावी. जिल्हावासियांना आरोग्य सेवेसाठी अन्य ठिकाणी जावे लागू नये, यासाठी उत्तम आरोग्य व्यवस्था येथे निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय आणि संशोधन केंद्र नेरूर येथे शनिवारी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. या मोफत महाआरोग्य शिबिराला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तब्बल १ हजार २८९ रुग्णांनी विविध रोगांवरील उपचारांचा लाभ घेतला. या शिबिरात बेळगाव (कर्नाटक) येथील के.एल्.ई. रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकासह विविध रोगांवरील तज्ञ डॉक्टरनी रुग्णांची तपासणी, तसेच विनामुल्य औषधोपचार केले. या शिबिरात तपासलेल्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार बेळगाव येथे के.एल्.ई. रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.
शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी ‘आयुष्मान भारत योजने’चे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, के.एल्.ई. हॉस्पीटलचे डॉ. माधव प्रभू, अदिती पै आणि डॉ. अल्लमप्रभू कुडची, बॅ. नाथ पै शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, सीईओ अमृता गळावाणकर, जि प सदस्य दीपलक्ष्मी पडते, काका कुडाळकार, संजय पडते, नीता राणे, जि प सदस्य रुपेश पावसकर, जि प सदस्य आरती पाटील, जि प सदस्य नागेश आईर, नेरूर सरपंच भक्ती घाडीगावकर, माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, संध्या तेरसे , गजानन कांदाळगावकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भांडारी, फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार्या अशाप्रकारच्या शिबिरांना होणारी गर्दी पाहिली की ‘जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुधारली पाहिजे, हा संदेश आम्हाला मिळतो. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य सेवेत स्वयंपूर्ण व्हावा. येथेच जिल्हावासियांना चांगली आरोग्य सेवा मिळावी. जिल्हावासियांना आरोग्य सेवेसाठी अन्य ठिकाणी जावे लागू नये, यासाठी उत्तम आरोग्य व्यवस्था येथे निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या शिबिराच्या माध्यमातून तसेच पुढेही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न चांगला आहे. यासाठी आयोजकांचे मी आभार मानतो. या प्रयत्नांना आमचे नेहमीच सहकार्य राहील. जिल्हावासियांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आपण एकत्रपणे काम करूया, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी या वेळी केले.
केएलई हॉस्पीटलच्या संचालक मंडळाचे सदस्य डॉ. माधव प्रभू (खानोलकर) म्हणाले, मी मूळचा वेंगुर्ला तालुक्यातील खानोली येथील आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि माझे जवळचे नाते आहे. हे आरोग्य शिबिर एक प्रारंभ आहे. नेरूर येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे के.एल्.ई. रुग्णालयाचे एक केंद्र चालू करण्यात येणार आहे. हे केंद्र बेळगाव येथील केएलई रुग्णालय आणि जिल्हावासिय यांच्यातील एक दुवा असणार आहे. येथून बेळगाव येथील रुग्णालयात येणार्या रुग्णाला कोणत्याही प्रकारे अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनाही येथे कार्यन्वित आहे. या अंतर्गत विनामुल्य उपचारही येथे केले जाणार आहेत. केएलई रुग्णालयात सर्व अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. त्यामुळे या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. माधव प्रभू खानोलकर यांनी केले.
शिबिराच्या ठिकाणी आलेल्या रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी आयोजक, तसेच स्वयंसेवक यांचे प्रयत्न चांगले होते. न्याहारी, दुपारी जेवण, पिण्याचे पाणी आदी सुविधाही देण्यात आल्या. आलेल्या रुग्णांना उपचार कक्षापर्यंत नेणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे, सर्वांना उपचार मिळावेत, यासाठी प्रयत्न करतांना स्वयंसेवक दिसत होते.





