जल-मृद संवर्धनासाठी ‘रील स्पर्धा’

विजेत्यांना २५ हजारांपर्यंतची बक्षिसे
स्पर्धेत सहभागी होण्याचे विभागाचे आवाहन
विजेत्यांना युवा जलदूत म्हणून गौरवण्यात येणार
मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने युवक-युवतींसाठी ‘रील स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. जल-मृद संवर्धनाचा संदेश आधुनिक सोशल मीडिया माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे, तसेच युवकांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
या स्पर्धेत १५ ते ३० वयोगटातील महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. माती संवर्धन, पाणी बचत, मृद्संधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन व पुनर्वापर, शेततळे, बंधारे व जलसंधारणाची कामे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण, ग्रामस्तरावरील यशस्वी कामे, पारंपरिक पद्धती तसेच नाविन्यपूर्ण कल्पना अशा विविध विषयांवर रील तयार करता येणार आहे.
रीलचा कालावधी ३० ते ६० सेकंद असावा. तयार केलेली रील १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सहभागींच्या पब्लिक Instagram अकाउंटवर अपलोड करणे आवश्यक आहे. रीलमध्ये #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी Storytelling, Acting, Music, Dance, Animation, AI Creative, Comedy, Short Film, Before-After, Drone Visuals आदी सर्जनशील माध्यमांचा वापर करता येणार आहे. मात्र रीलचा मुख्य संदेश माती व पाणी संवर्धनाशी संबंधित असणे आवश्यक आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी जिल्हास्तरीय आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून प्रथम क्रमांकास २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. विजेत्यांचा ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.
सहभागासाठी प्रथम विषय निवडणे, त्यानंतर रील तयार करणे आणि जिल्हा निवड व Verification प्रक्रिया पूर्ण करून स्पर्धेत सहभागी होता येईल. इच्छुक युवक-युवतींनी दिलेल्या QR कोड किंवा register.mahaevent.co.in या नोंदणी माध्यमातून सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“एक Reel… लाखो विचारांना जोडणारे! एक Reel… सुरक्षित भविष्य घडवणारे!” या संकल्पनेतून युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जल व मृद संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाने केले आहे.






