जिल्ह्यात २६ सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र सुरू होणार

शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा; जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी सहकाराच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील सुमारे २६ सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सभागृहात विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे चेअरमन, सचिव तसेच काजू कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दळवी बोलत होते. या बैठकीला सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे, उद्योजक दिपक ठाकूर, अच्युत कँश्यू इंडस्ट्रीचे मालक सुधीर झांट्ये तसेच जिल्ह्यातील जवळपास ४६ विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी तसेच काजू प्रक्रिया उद्योगाशी संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन होत असून या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सहकाराच्या माध्यमातून खरेदी-विक्रीची साखळी उभी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दळवी यांनी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर जिल्ह्यातील सुमारे २७ सहकारी संस्थांनी काजू खरेदी केंद्र सुरू करण्यास सहमती दर्शवली असल्याची माहिती त्यांनी दिली.

या माध्यमातून संबंधित गावांमधील सहकारी संस्थांमार्फतच शेतकऱ्यांचा काजू माल खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गावातच काजू विक्रीची सोय उपलब्ध होणार असून त्यांना वाहतूक खर्च व अडचणी कमी होणार आहेत.

यासंदर्भात १६ मार्च रोजी जिल्ह्यातील काजू प्रक्रिया उद्योगधारकांबरोबर स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे दळवी यांनी स्पष्ट केले.

सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावागावात काजू खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही सहकार्य करावे आणि या केंद्रांमार्फत आपला काजू माल विक्रीस द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या उपक्रमामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वासही दळवी यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!