कुडाळ MIDC मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद

सुमारे ३० उद्योगांचे उत्पादन ठप्प
कुडाळ औद्योगिक वसाहतीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा अचानक बंद झाल्यामुळे सुमारे ३० उद्योगांचे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले असून उद्योगांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत कुडाळ MIDC इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे तातडीने निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कोणतीही पूर्वसूचना न देता व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक उद्योगांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला हा अत्यावश्यक घटक अचानक उपलब्ध न झाल्याने उद्योगांमध्ये उत्पादन प्रक्रिया थांबली आहे.
विशेष म्हणजे, कुडाळ MIDC मधील काही उद्योग निर्यात व्यवसायाशी संबंधित असून त्यांचे परदेशातील ग्राहकांशी करारबद्ध व्यवहार आहेत. उत्पादन ठप्प झाल्यामुळे करारातील अटी पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होत असून संबंधित उद्योगांना आर्थिक नुकसान आणि दंडात्मक कारवाईचा दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे.
शासनाकडून पूर्वी देण्यात आलेल्या सूचनांवर विश्वास ठेवून अनेक उद्योगांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा अतिरिक्त साठा केलेला नव्हता. मात्र अचानक सेवा बंद झाल्याने उद्योगांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर कुडाळ MIDC इंडस्ट्रीज असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने हस्तक्षेप करून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा त्वरित आणि नियमित सुरू करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. तसेच झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे यांनाही देण्यात आली आहे.





