यंदाचा आरती प्रभू पुरस्कार कवी प्रा. प्रवीण दवणे यांना जाहीर

कुडाळ येथे ८ मार्चला वितरण सोहळा
बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या वतीने पुरस्कार
बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा ‘आरती प्रभू पुरस्कार-२०२६’ सुप्रसिद्ध कवी, गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या जन्मदिनी म्हणजेच येत्या ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता एकनाथ ठाकूर सभागृह, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे केले जाणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते प्रसाद पंडित यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
संत राऊळ महाराज महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी अनंत वैद्य आणि विवेक देसाई उपस्थित होते.
यावेळी केदार सामंत यांनी सांगितले, बाबा वर्दम थिएटर्स, ही कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील हौशी कलाकारांची नाट्यसंस्था, कुडाळ येथील कै. बाबा वर्दम, कै. वामनराव पाटणकर, कै. शंकरभाई वर्दम यांच्या प्रेरणेने व श्री. चंदू शिरसाट या प्रतिभावंत दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ. वर्षा वैद्य यांच्या नेतृत्वाखाली गेली ५४ वर्षे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात अग्रस्थानी आहे.
कै. चिं.त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू हे कुडाळचे सुपुत्र. त्यांच्या लोकविलक्षण प्रतिभेबद्दल कुडाळच्या साहित्य, नाट्य व शैक्षणिक क्षेत्रात वावरणाऱ्या सर्वांना अतिशय आदर आहे. त्यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात याकरीता त्यांच्या नावाने कवी, कवयित्री आणि नाटककार यांना आरती प्रभु पुरस्कार दिला जातो.
बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आणि आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा आरती प्रभू पुरस्कार सन २०१३ पासून कविता आणि नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कवी किंवा नाटककारास दरवर्षी दिला जातो. रोख रु. २१,०००/-, स्मृतीचिन्ह, मानपत्र व शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सन २०१३ सालचा पहिला पुरस्कार गोवा येथील प्रसिध्द कवी व नाटककार श्री. विष्णू सूर्या वाघ, सन २०१४ सालचा पुरस्कार पुणे येथील प्रसिध्द नाटककार श्री. सतीश आळेकर तर सन २०१५ सालचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द नाटककार श्री. शफाअत खान, सन २०१६ सालचा पुरस्कार नागपूर येथील प्रसिध्द नाटककार श्री. महेश एलकुंचवार, सन २०१७ सालचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द नाटककार श्रीम. सई परांजपे, सन २०१८ सालचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द कवी श्री. महेश केळूसकर, सन २०१९ सालचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द कवी श्री. किशोर कदम उर्फ सौमित्र, सन २०२१ सालचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द नाटककार श्री. प्रेमानंद गज्वी, सन २०२२ सालचा पुरस्कार प्रसिध्द कवी श्री. गुरु ठाकूर, सन २०२३ सालचा पुरस्कार पुणे येथील प्रसिध्द कवयित्री श्रीम. अरुणा ढेरे, सन २०२४ सालचा पुरस्कार पुणे येथील प्रसिध्द नाटककार श्री. चं. प्र. देशपांडे, सन २०२५ सालचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द नाटककार श्री. प्रशांत दळवी यांना प्रदान करण्यात आला.
या वर्षीचा पुरस्कार ठाणे येथील सुप्रसिध्द कवी प्रा. प्रविण दवणे यांना देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण चिं.त्र्यं. खानोलकर यांच्या जन्मदिनी म्हणजेच रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वा. एकनाथ ठाकूर सभागृह, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे केले जाणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडीत यांच्या हस्ते व बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा सौ. वर्षा वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोहळ्याला अमेरिकास्थित सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. अनिल नेरूरकर, बाबा वर्दम थिएटर्सचे संस्थापक चंदु शिरसाट व क. म. शि. प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत यांनी केले आहे.





