निसर्गातून जीवनाचा सकारात्मक संदेश मालवणच्या डॉ. शिल्पा झांट्ये यांचा ‘100 शिल्पा कविता’ काव्यसंग्रह 1 मार्चला प्रकाशित

निसर्गातील अमूल्यतेची जाणीव करून देत जीवनाकडे सकारात्मक आणि आशावादी दृष्टीकोनातून पाहण्याचा संदेश देणारा ‘100 शिल्पा कविता’ हा इंग्रजी काव्यसंग्रह येत्या 1 मार्च रोजी प्रकाशित होत आहे. विशेष म्हणजे हा काव्यसंग्रह स्त्रीरोग तज्ञ म्हणून ओळख असलेल्या डॉ. शिल्पा झांट्ये यांनी लिहिला आहे.
वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असतानाच साहित्य क्षेत्रातही ठसा उमटवणाऱ्या मालवण मधील डॉ. शिल्पा झांट्ये यांचा ‘100 शिल्पा कविता’ हा इंग्रजी काव्यसंग्रह 1 मार्च रोजी वाचकांच्या भेटीला येणार आहे.
या काव्यसंग्रहामधून निसर्गाचे सौंदर्य, त्यातील अमूल्यत्व आणि मानवी जीवनाशी असलेले नाते अत्यंत प्रभावी शब्दांत मांडले आहे. सर्व कवितांमध्ये जीवनाकडे सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोनातून पाहण्याचा संदेश आहे. प्रेम, मैत्री आणि आठवणींची जपणूक करत कृतज्ञतेची भावना ठेवावी, असे त्यातून सांगितले आहे. स्वतःची इतरांशी तुलना न करता आत्मविश्वासाने पुढे जावे आणि प्रत्येक गोष्ट मनापासून उत्तम करण्याचा प्रयत्न करावा, ही प्रेरणा दिली आहे. बदल स्वीकारून, समाजाच्या लेबल्सपासून मुक्त होऊन स्वतःची खरी ओळख जपावी, असा देखील आशय या कवितांमधून व्यक्त होतो.
कवितांमधून जीवनाकडे सकारात्मक, आशावादी आणि प्रेरणादायी दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक कविता ही अनुभवांची, संवेदनांची आणि विचारांची सुंदर अभिव्यक्ती ठरते.
‘100 शिल्पा कविता’ हे नावच या संग्रहाची वेगळी ओळख निर्माण करते. वैद्यकीय सेवेच्या धावपळीतून वेळ काढत साहित्यसाधना करणारे त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
1 मार्च रोजी होणाऱ्या या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याकडे साहित्यप्रेमींचे लक्ष लागले आहे. वैद्यकीय आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात समतोल साधणाऱ्या डॉ. शिल्पा झांट्ये यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.





