कणकवली-नांदगाव येथे भीषण अपघात; प्रसिद्ध कवयित्री प्रा. शरयू आसोलकर यांचे दुर्दैवी निधन

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात सावंतवाडी येथील प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका प्रा. शरयू कृष्णा आसोलकर (वय ५९) यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे सावंतवाडी शहरासह शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रा. शरयू आसोलकर या आपल्या बहिणीला राजापूर येथे सोडण्यासाठी इनोव्हा चारचाकी गाडीतून गेल्या होत्या. तेथून सावंतवाडीच्या दिशेने परतत असताना कणकवली-नांदगाव येथे महामार्गावरील डिव्हायडरवर गाडी चढून रस्त्यालगतच्या खांबाला धडकली. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
या गाडीत त्यांचे बंधू वैभव आसोलकर हे देखील होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून ते सुखरूप आहेत. त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रा. शरयू आसोलकर या कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. अध्यापनासोबतच त्यांचा साहित्य क्षेत्रातही विशेष परिचय होता. त्या लेखिका आणि कवयित्री म्हणून ओळखल्या जात होत्या.
अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडीतील माठेवाडा परिसरातील नागरिकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते नागेश जगताप, सुदेश नेवगी, महेश बांदेकर यांच्यासह माठेवाड्यातील मित्रपरिवाराने रुग्णालयात पोहोचून मदतकार्य केले.
दरम्यान, प्रा. शरयू आसोलकर यांच्या निधनाची बातमी समजताच सावंतवाडी शहरात शोककळा पसरली आहे. कोल्हापूर आणि बेंगळुरू येथील त्यांचे जवळचे नातेवाईक सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाले आहेत.
याबाबतची माहिती सावंतवाडी येथील जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी दिली.






