शिवसेनेच्या गडकिल्ले स्पर्धेत मुरुड जंजिराची बाजी

राजगड, हरिहर गड अनुक्रमे द्वितीय-तृतीय

छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास, स्वराज्याची प्रेरणा आणि महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांचा वैभवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने शिवसेना कुडाळ शहराच्या वतीने आयोजित गडकिल्ले स्पर्धा २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत शहरातील दहा स्पर्धकांनी विविध ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारत आपली कल्पकता आणि कलाकौशल्य प्रदर्शित केले.
स्पर्धेत शिवम शिंदे यांनी साकारलेल्या मुरुड जंजिरा किल्ल्याच्या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला. नरसिंह महापुरुष मित्रमंडळ, लक्ष्मीवाडी यांच्या राजगडाच्या प्रतिकृतीला द्वितीय, तर केळबाई मित्रमंडळाने साकारलेल्या हरिहर गडाच्या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक मिळाला.
याशिवाय अमित कारेकर यांनी रायगड, श्लोक वेदक यांनी सिंहगड, गोविंद घाडी यांनी प्रतापगड, घाडीवाडी मित्रमंडळाने विजयदुर्ग, महेश ओटवणेकर यांनी मुरुड जंजिरा, विधी जळवी यांनी विजयदुर्ग, तर निनाद नाईक यांनी राजगड किल्ल्याच्या प्रतिकृती साकारल्या.
स्पर्धेच्या परीक्षणप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी भेट देऊन स्पर्धकांच्या कलाकृतींची पाहणी केली. यावेळी मालवण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर उपस्थित होते. संदीप चिऊलकर आणि साळसकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रतिकृतींची रचना, मांडणी, कलात्मकता आणि ऐतिहासिक वैशिष्ट्यांच्या आधारे त्यांनी परीक्षण केले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, माजी नगरसेवक राकेश कांदे, शिवसेना शाखाप्रमुख योगेश काळप, प्रथमेश कांबळी, निलेश उर्फ बंड्या शिरसाट, राजाराम गडेकर, संदेश सावंत यांच्यासह शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.
गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याच्या माध्यमातून मुलांपासून तरुणांपर्यंत शिवछत्रपतींचा इतिहास, स्वराज्याची प्रेरणा आणि ऐतिहासिक वारशाविषयी अभिमान जागवण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून करण्यात आला. स्पर्धकांनी दाखवलेली मेहनत, कल्पकता आणि उत्साह उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

error: Content is protected !!