खासगी जागेतील बेकायदेशीर पाण्याची टाकी हटविण्यासाठी करूळ मधील सिद्धेश केसरकर यांचे उपोषण

ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकाऱ्यांवर प्रश्नांची केली सरबत्ती
उपोषणावर मार्ग काढण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आश्वासन
कणकवली तालुक्यातील करूळ येथील खासगी जागेत ग्रामपंचायतीमार्फत बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेली पाण्याची टाकी हटविण्यात यावी, तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून झालेला खर्च वसूल करावा, अशी मागणी करत करुळ येथील सिद्धेश केसरकर यांनी पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेत गटविकास अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर बेकायदेशीर काम करणाऱ्या ग्रामपंचायत वर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन द्या अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे सेनेने दिल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याची लेखी आश्वासन दिले जाईल अशी ग्वाही दिल्याची माहिती ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख राजू राठोड यांनी दिली. सिद्धेश केसरकर यांच्या निवेदनानुसार, त्यांच्या मालकीच्या खासगी जागेत ग्रामपंचायतीमार्फत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही टाकी हटविण्याबाबत त्यांनी ८ एप्रिल २०२६ रोजी प्रथम लेखी पत्र दिले होते. त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी जुलै २०२६ अखेरपर्यंत टाकी हटवून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र, आश्वासन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व गटविकास अधिकारी यांच्याकडे १३ सप्टेंबर २०२६ रोजी लेखी तक्रार केली. तसेच ६ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित बांधकामाबाबत पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल केल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत, १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत टाकी पूर्णपणे हटवून जागा मोकळी करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच लेखी आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न करणाऱ्या वरिष्ठ व संबंधित ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तसेच बेकायदेशीर बांधकामास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणात झालेला प्रशासकीय व पोलिस पाठपुराव्याचा खर्च तसेच मानसिक त्रासापोटी झालेला खर्च ग्रामपंचायतीकडून वसूल करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत मागण्यांची पूर्तता न झाल्यास १७ नोव्हेंबरपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा अंतिम इशारा त्यांनी दिला होता. परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज पासून पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख व युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख राजू राठोड, प्रथमेश सावंत, विभाग प्रमुख रुपेश अंबडोस्कर, बबली राणे, रवींद्र खंदारे, ओमप्रकाश ताम्हणकर, विलास गुडेकर चंदू परब अवि सावंत आदी उपस्थित होते.





