आवळेगावच्या दहीकाल्याने सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांचा होणार श्रीगणेशा

श्री देव नारायण मंदिरात २१ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीचा दहीकाला
दिवाळीची सांगता होताच तळकोकणात वार्षिक जत्रोत्सवांचा हंगाम सुरू होतो. या हंगामातील पहिली यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथील ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिराचा दहीकाला उत्सव शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिक प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी साजरा होणार आहे.
यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता श्रींच्या मूर्तीवर अभिषेक करून उत्सवाला प्रारंभ होईल. सकाळी १० वाजता दर मंदिर ते श्री नारायण मंदिर अशी पायी दिंडी काढण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता हरिपाठ, रात्री ११.३० वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा आणि त्यानंतर रात्री १२.३० वाजता खानोलकर दशावतार कंपनीचे दशावतारी नाटक (दहीकाला) सादर होणार आहे. यावेळी भाविकांसाठी ओटी भरण्याचा कार्यक्रमही होणार आहे.
श्री देव नारायण मंदिराशेजारी असलेल्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरातही कार्तिकी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रोत्सवांच्या हंगामातील पहिली यात्रा असल्याने आवळेगावच्या या दहीकाल्याला विशेष महत्त्व आहे. आवळेगाव दशक्रोशीसह जिल्ह्याच्या विविध भागांतून भाविक आणि दशावतारी नाटकांचे रसिक या यात्रेला आवर्जून उपस्थित राहतात. या उत्सवानिमित्त गावातील प्रत्येक घर सडा-रांगोळ्यांनी सजविले जाते. मुंबई, पुणे तसेच परदेशात नोकरीनिमित्त स्थायिक झालेले आवळेगावचे चाकरमानीही या जत्रोत्सवासाठी मोठ्या संख्येने गावी येतात.
या जत्रोत्सवानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २२ नोव्हेंबरपासून तुळशी विवाहांना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे परिसरात उसाच्या वाडांना मोठी मागणी असते. आवळेगावच्या या यात्रेपासून जिल्ह्यातील गावोगावच्या वार्षिक जत्रोत्सवांना सुरुवात होत असल्याने भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मानकरी, देवस्थान कमिटी आणि आवळेगाव ग्रामस्थांनी केले आहे.





