सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन मिळावे

रविकिरण तोरसकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
तारकर्ली, देवबाग, चिवला किनाऱ्यांचा समावेश करण्यासाठी सर्वेक्षण व डीपीआर तयार करण्याची मागणी
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेचे मानले जाणारे ‘ब्लू फ्लॅग’ (Blue Flag) मानांकन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांनाही मिळावे, यासाठी मालवण नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक तथा नीलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या २०२६-२७ च्या ब्लू फ्लॅग मानांकन यादीत महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांचा समावेश झाला आहे. मात्र, निसर्गसौंदर्य, स्वच्छ वाळू आणि समृद्ध सागरी जैवविविधतेने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही समुद्रकिनाऱ्याला अद्याप हे मानांकन मिळालेले नाही. ही बाब लक्षात घेऊन सिंधुदुर्गातील प्रमुख किनाऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी तोरसकर यांनी केली आहे.
तारकर्ली, देवबाग, चिवला, वायरी, दांडी, सागरेश्वर, आरवली, केळुस, तळाशील, आचरा, निवती, भोगवे आणि विजयदुर्ग यांसारख्या समुद्रकिनाऱ्यांमध्ये ब्लू फ्लॅग मानांकनासाठी आवश्यक निकष पूर्ण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र सागरी मंडळ आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून या किनाऱ्यांचे प्राथमिक सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
किनाऱ्यांवर पर्यावरणपूरक स्वच्छतागृहे, कपडे बदलण्यासाठी खोल्या, सौरऊर्जेवर आधारित दिवे, घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था, जीवरक्षक टॉवर आणि दिव्यांगांसाठी रॅम्प यांसारख्या सुविधा उभारण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच सीआरझेड नियमांनुसार आवश्यक तरतुदींचा विचार करून बांबू व लाकडासारख्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
या विकासकामांदरम्यान स्थानिक मच्छीमार बांधवांचे पारंपरिक मासेमारीचे हक्क आणि बोटी लावण्याच्या जागांचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचेही तोरसकर यांनी स्पष्ट केले आहे.
ब्लू फ्लॅग मानांकनामुळे सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळू शकते. त्यातून पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी आणि मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.






