अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र हिंमतबाज नेत्याला मुकला

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केल्या अजितदांच्या प्रति भावना व्यक्त

कणकवली मध्ये अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा

विमान अपघातामध्ये अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्रातील जनतेने एका खंबीर, अत्यंत कार्यक्षम, हिंमतबाज आणि प्रशासन कुशल नेतृत्वाला गमावले आहे. राजकारणात सहासष्ट वर्ष हे असे निघून जाण्याचे नसते. तर ते उमेदीचे असते . दादांच्या जाण्याने अखंड महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.कारण दादा हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचे होते. असे उद्गार कणकवली चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी काढले. कणकवलीत पटवर्धन चौक येथे नगरपंचायत च्या वतीने आयोजित शोकसभेत ते बोलत होते. संदेश पारकर पुढे म्हणाले, दादांचा राजकारणातील प्रवेश शरद पवार यांचे पुतणे म्हणून झाला.परंतू त्यानी राज्याच्या राजकारणात स्वतः च्या कर्तबगारीने स्वतःचे स्थान निर्माण केले.त्यांनी खंबीरपणे व हिंमतीने राजकारणात केले. परंतू सर्वच पक्षांतील नेते, कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे संबंध मित्रत्वाचे राहिले. कोणाशी राजकीय वैमनस्य निर्माण केले नाही . ते स्पष्टवक्ते होते.मनात येईल ते बोलत. कोणाची भीडभाड बाळगत नसत..पण त्यात विखारीपणा नसल्याने कोणाची मने दुखावली नाहीत. दादांचा कामाचा उरक, कार्यक्षमता प्रचंड होती.जे काम होणार नाही.. त्याबद्दल ते स्पष्टपणे सांगत. होणारे काम झटकन करत.
दादाची राज्याच्या प्रशासनावर वचक आणि मजबूत पकड होती. काटेवाडी या आपल्या गावातील सहकारी संस्थाचे चेअरमन पदापासून त्यांनी आपल्या सहकारी व राजकीय जीवनाला प्रारंभ केला. आणि राज्याच्या सहकार क्षेत्रातील शिखर बँक असलेल्या राज्य सहकारी बँकेचे संचालक, अध्यक्ष हे सहकारी क्षेत्रातील सर्वोच्च पद भूषविले. खासदार,सहा वेळा आमदार, मंत्री आणि सहा वेळा उपमुख्यमंत्री पद अशी अनेक मानाची पदे भूषवली . परंतु दादांनी त्या पदांचा वापर जनतेच्या हितासाठी, राज्याच्या विकासासाठी केला. सहावेळा उपमुख्यमंत्री पद भूषवूनही त्यांना मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याचे स्वप्न कही पूर्ण झाले नाही. ती खंत उराशी बाळगूनच दादा अकाली गेले.
दादा वर मोठमोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले. भरपूर टीका ही झाली. परंतु त्यातून अजिबात विचलित न होता. त्या सर्व आरोपांशी त्यानी खंबीरपणे मुकाबला केला. तीन वर्षे पूर्वी आपले राजकीय गुरू काका शरद पवार यांच्या पासून वेगळे होऊन ते सत्तेच्या राजकारणात गेले. परंतु त्यांनी आपला कौटुंबिक जिव्हाळा, नातेसंबंध कायम राखला . तीस वर्षांपूर्वी कोकणचे साहित्य भूषण मधू मंगेश कर्णिक यांच्या एकसष्टी निमित्ताने त्यांचा कणकवली वासियांच्या वतीने नागरी सत्कार व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या सोहळ्याला महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे आजी माजी मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्रातील थोर साहित्यिक, लेखक आले होते. समारंभाचा खर्च मोठा होता. मी त्यावेळी कणकवलीचा नगराध्यक्ष होतो. आम्ही सत्कार समितीच्या वतीने अजित दादांना भेटलो. दादानी तात्काळ दोन लाख रुपये पाठवून दिले.एका थोर साहित्यिकाचा नागरी सत्कार होणार याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला होता. असे दादा दिलदार, मनमोकळ्या स्वभावाचे होते. त्यांना नगराध्यक्ष या नात्याने कणकवली शहरातील नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो.असे श्री पारकर म्हणाले.

error: Content is protected !!