भिरवंडे श्री देव रामेश्वर मंदिरात रविवारपासून अखंड हरिनाम सप्ताह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सिंधुदुर्गातील जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात माघ शुद्ध रथसप्तमी पासून म्हणजेच रविवार 25 जानेवारी ते रविवार 1 फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हरिनाम सप्ताहामुळे रविवारपासून संपूर्ण भिरवंडे गाव भक्तीरसात न्हावून निघणार आहे. कणकवलीपासून 16 कि.मी. अंतरावर सह्याद्रीच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात श्री देव रामेश्वराचे मंदिर आहे. सध्या या मंदिराच्या नूतन वास्तूचे काम सुरू आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावर श्री देव रामेश्वर मंदिर धार्मिक पर्यटन स्थळ म्हणूनही नावारुपास आले आहे. दरवर्षी सिंधुदुर्गसह राज्याच्या विविध भागातील लाखो पर्यटक आणि भाविक भक्तगण या मंदिराला भेट देतात. हरिनाम सप्ताहाच्या कालावधीत तर जिल्हयाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक श्री देव रामेश्वराच्या दर्शनाला येतात. अखंड हरिनाम सप्ताहामुळे गावात जणू प्रति पंढरपूरच अवतरते. गावातील स्थानिक ग्रामस्थांसह चाकरमानी मंडळी, पाहुणे मंडळी भक्तीभावाने या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा अखंड हरिनाम सप्ताह सर्वांसाठीच भावभक्तीचा महासोहळाच असतो. रविवार 25 जानेवारी रोजी दु. 2 वा. मंदिरात घटस्थापना होवून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सप्ताह कालावधीत जिल्हयातील नामवंत भजनी बुवांची भजने, वारकरी संगीत भजने, भावगीत सुगम संगीत, चित्ररथ असे विविध कार्यक्रम होणार आहेत. रात्री 12 वा. श्री देव रामेश्वराची सवाद्य पालखी मंदिर प्रदक्षिणा होते. पालखी प्रदक्षिणेचा सोहळा हा नयनरम्य असतो. सप्ताहानिमित्त 26 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत दुपारी 1 ते 3 वा. या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या हरिनाम सप्ताहाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवालये संचालक मंडळ, भिरवंडे व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे. सप्ताहानिमित्त होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे- रविवार 25 जानेवारी रात्री 9.30 वा. संगीत भजन, बुवा कुणाल परब (टेवणाई प्रा.भजन मंडळ बाल कलाकार तरंदळे). सोमवार 26 जाने. दु. 12.30 वा. महिला भजन- बुवा अंकिता गावडे (अष्टविनायक महिला भजन मंडळ, साळेल-मालवण), रात्री 9.30 वा. भजन- बुवा मिलिंद लाड (बालमित्र प्रा. मंडळ फोंडाघाट), रात्री 10.30 वा. चित्ररथ – वादळ मेस्त्री (रामेश्वर माऊली वशिक रंगीत दिंडी, नाटळ). मंगळवार 27 जाने.- दु. 1 वा. महिला भजन- बुवा रिया मेस्त्री (स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ लोरे नं. 1), रात्री 9.30 वा. भजन-बुवा वैभव नाणचे (मेजारेश्वर भजन मंडळ नागवे). बुधवार 28 जाने. दु. 12.30 वा. दिंडी भजन- बुवा निलेश परब (महालक्ष्मी दिंडी भजन मंडळ, नांदगाव), रात्री 9.30 वा. भजन – बुवा शशिकांत राणे (बाबा भालचंद्र भजन मंडळ जाणवली), रात्री 10.30 वा. भजन – बुवा ॠषिकेश मेस्त्री (परब्रह्म संगीत भजन मंडळ, नांदगाव), रात्री 11 वा. चित्ररथ (जि.प. प्राथमिक शाळा हरकुळ खुर्द गावडेवाडी). गुरुवार 29 जाने. एकादशी महोत्सव – दु. 12.30 वा. भावगीत, सुगमसंगीत (श्री सद्गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी), रात्री 10 वा. भजन सम्राट बुवा श्रीधर मुणगेकर, मुंबई, रात्री 11.30 वा. बालदिंडी चित्ररथ (केंद्रशाळा भिरवंडे नं. 1). शुक्रवार 30 जाने. दु. 12.30 वा. महिला भजन- बुवा दिव्या गोसावी (आदिनाथ सिद्ध महापुरूष भजन मंडळ जाणवली), रात्री 9.30 वा. संगीत भजन बुवा अमेय आर्डेकर (नागेश्वर भजन मंडळ नागवे), रात्री 10.30 वा. चित्ररथ (जि.प. शाळा भिरवंडे खलांतर नं. 2). शनिवार 31 जाने. दु. 12.30 महिला भजन – बुवा सौ. ॠतुजा पाळेकर-सावंत (भूतनाथ महिला भजन मंडळ घोणसरी), सायं. 7 वा. संगीत भजन- बुवा सचिन राणे (लिंगेश्वर पावणाई भजन मंडळ वाघेरी), रात्री 8.30 वा. संगीत भजन- बुवा प्रशांत सावंत मुंबई (ईस्वटी ब्राह्मण भजन मंडळ कुंभवडे), रात्री 9.30 वा. संगीत भजन- बुवा उदय राणे (राधाकृष्ण भजन मंडळ जाणवली) रात्री 10 वा. वारकरी दिंडी भजन (माऊली वारकरी दिंडी भजन मोर्ये, देवगड), रात्री 11 वा. चित्ररथ (माध्यमिक विद्यामंदिर कनेडी).

error: Content is protected !!