स्थानिक म्हणून नेरूर मध्ये गावाचा मलाच कौल !

अपक्ष उमेदवार रुपेश पावसकर यांचा दावा

२७ जानेवारीला भूमिका करणार स्पष्ट

कुडाळ : नेरूर जिल्हा परिषद मतदार संघातील इतर गावसह सर्वांचा मला पाठिंबा आहे. स्थानिक म्हणून गावनेच मला निवडून देण्याचा शब्द दिला आहे, अस नेरूर देऊळवाडा जि प मतदार संघातुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे रुपेश पावसकर यांनी स्पष्ट केलं. याबाबतची भूमिका २७ जानेवारीला स्पष्ट करणार असल्याच ते म्हणाले. कुडाळ इथं त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
       दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रुपेश पावसकर यांनी नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रश्न आणि विकासात्मक मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाणार असून, गावातील स्थानिक ग्रामस्थांनी आपल्याला जाहीर पाठींबा देण्याचे ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. पावसकर म्हणाले की, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण निवडणूक रिंगणात पुढे जाणार आहोत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच २७ जानेवारी रोजी, पाठींब्याबाबतचा अधिकृत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. आपण भाजपचे कार्यकर्ते असलो तरी कोणत्याही पक्षाबाबत नाराज नसल्याचे स्पष्ट करत, ही लढत स्थानिक विकासासाठी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गावाचा आपल्याला पाठींबा असून नेरूर देऊळवाडा जि. प. मतदारसंघात कणकवली नगरपालिका निवडणुकीतील ‘शहर विकास आघाडी’ पॅटर्न राबवण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले.
रुपेश पावसकर यांच्या विरोधात शिवसेनेचे संजय पडते उभे आहेत. त्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, ते आमचे गुरू आहेत. गुरूच्या वाटा शिष्याला माहीत असतात, असे उत्तर दिले. २७ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आपल्या सोबत कोण आहे आणि काय रणनीती असणार आहे याबाबत माहिती देऊ अस श्री. पावसकर शेवटी म्हणाले.

error: Content is protected !!