कणकवलीत भाजपाकडून ठाकरे शिवसेनेला सलग दुसऱ्या दिवशी धक्का

ठाकरे गटाच्या खारेपाटण जि. प. च्या उमेदवार मीनल तळगावकर यांची माघार
भाजपाच्या प्राची इस्वलकर बिनविरोध
कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे शिवसेनेला धक्का तंत्राचा सलग सपाटा लावण्यात आला असून, आज सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मधील ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार प्राची इस्वलकर या बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे कणकवली तालुक्यात बिनविरोध निवडून आलेल्या भाजपाच्या उमेदवारांची संख्या 3 तर कणकवली मतदारसंघात एकूण संख्या चार वर पोहोचली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांचा “दे धक्का तंत्र” सध्या मतदारसंघासह राज्यात चर्चेचा विषय बनला असून, मीनल तळगावकर यांच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या निर्णयामुळे ठाकरे सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. आज शनिवार असून देखील निवडणूक कामकाजामुळे निवडणूक कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे आजच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज अजून कोण माघारी घेणार त्याची उत्सुकता लागून राहिली आहे. कालच या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार उज्वला चिके यांनी माघार घेतली होती. त्यानंतर आज ठाकरे सेनेच्या या मतदारसंघातील प्राची इस्वलकर यांच्या विरोधातील एकमेव उमेदवार मीनल तळगावकर यांनी माघार घेतल्याने आता प्राची इस्वलकर या एकमेव उमेदवार या मतदारसंघात राहिल्या आहेत. त्यामुळे या धक्का तंत्राचा मोठा फटका 27 जानेवारी रोजी शेवटच्या दिवशी बसण्याची शक्यता आहे.





