एसआरएम कॉलेजचा माजी विद्यार्थी गोपाळ सावंतची सीआरपीएफ मध्ये निवड

महाविद्यालय – संस्थेतर्फे सत्कार
कठोर मेहनत आणि जिद्दीमुळे यश
कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाचा आणि मराठी विभागाचा माजी विद्यार्थी गोपाळ सत्यवान सावंत याची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये निवड झाली असून ही बाब महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. गोपाळ सावंत हा २०२३–२४ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी असून, त्याने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर हे मोठे यश संपादन केल्याबद्दल महाविद्यालय व कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने गोपाळ सावंत याचे अभिनंदन करण्यात आले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कराची महाराष्टीय शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे यांच्या हस्ते गोपाळ सावंत या माजी विद्यार्थ्याला पुष्पगुच्छ देऊन त्याचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी क. म. शि. प्र. मंडळाचे उपाध्यक्ष का. आ. सामंत, उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सरकार्यवाह अनंत वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चव्हाण, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, एन. सी. सी. विभागप्रमुख कॅप्टन डॉ. एस. टी. आवटे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शरयू आसोलकर, प्रा. डॉ. ए. एन लोखंडे आदी उपस्थित होते.
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना गोपाळने शैक्षणिक अभ्यासाबरोबरच एन. सी. सी उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेतला होता. शिस्त, राष्ट्रप्रेम, नेतृत्वगुण आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा समतोल साधत त्याने आपली जडणघडण केली. एन. सी. सी. मधील प्रशिक्षणामुळे त्याच्यामध्ये देशसेवेची प्रेरणा अधिक दृढ झाली आणि त्याच प्रेरणेतून त्याने केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती होण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. यासाठी आवश्यक असणारा मैदानावरील सराव उपयुक्त ठरला.
केंद्रीय राखीव पोलीस दल ही देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची निमलष्करी दलाची संस्था असून, त्यात निवड होणे ही अत्यंत गौरवास्पद बाब मानली जाते. कठोर लेखी परीक्षा, शारीरिक चाचण्या आणि मुलाखतींच्या अनेक टप्प्यांतून यशस्वीरीत्या मार्ग काढत गोपाळ सावंत याने हे यश मिळवले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत त्याने सातत्याने कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचा आदर्श निर्माण केला.
त्याच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या एन. सी. सी विभागाची, मराठी विभागाची तसेच संपूर्ण महाविद्यालयाची मान उंचावली आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, एन. सी. सी. विभागप्रमुख कॅप्टन डॉ. एस. टी. आवटे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शरयू आसोलकर तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गोपाळ सावंत याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





