बालवाडी म्हणजे शिक्षणाची पहिली पायरी – सौ. सई काळप

सावंतवाडी संस्थांनच्या बालवाडीचे स्नेहसंमेलन उत्साहात
बालवाडी ही शिक्षणाची पहिली पायरी आहे. इथे फक्त मुलांना अक्षर ओळखच शिकवले जात नाही, तर शिस्त, सवयी व संस्कार शिकवले जातात, असे प्रतिपादन कुडाळ नगरपंचायत नगरसेविका व सामाजिक कार्यकर्त्या सई काळप यांनी केले. सावंतवाडी संस्थांनच्या बालवाडी स्नेहसंमेलनात त्या बोलत होत्या.
सावंतवाडी संस्थान मराठा समाज संचलित भगिनी मंडळ बालवाडीचे स्नेहसंमेलन शनिवारी सावंतवाडी संस्थानच्या मराठा सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष नगरसेविका सई काळप होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे पालक प्रतिनिधी समीर वेंगुर्लेकर, समाजाचे कार्यकारी विश्वस्त सतीश सावंत, अनुश्री माळगावकर, उपकार्याध्यक्ष शशिकांत गावडे, नरेंद्र सावंत, चिटणीस दिलीप दळवी, खजिनदार किशोर सावंत, संस्था हितचिंतक जितेंद्र पवार, कुडाळ समिती प्रमुख आर एल परब, समन्वयक नंदकिशोर गावडे, भगिनी मंडळ बालवाडी महिला अध्यक्ष डॉ. दिपाली काजरेकर, उपाध्यक्ष स्वाती सावंत, पालक, शिक्षकवर्ग आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सई काळप म्हणाल्या, आज इथे उपस्थित असलेले चिमुकले पाहून खूप आनंद झाला. मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या इतर कलागुणांना वाव देण्यासाठी सर्वांचे योगदान फार मोठे आहे. विशेष म्हणजे शेवटी ही मुलं आज या व्यासपीठावर येऊन आपली कला सादर करतात. काही मुलं गाणी म्हणतात, नृत्य करतात, अभिनय सादर करतात हे सर्व शिकवणे या बालवयातील मुलांना फारच सोपं काम नाही. त्यासाठी खूप मेहनत करून घ्यावी लागते आणि ही मेहनत आपण सर्व शिक्षकांनी घेतली आहे. त्याचबरोबर सर्व पालकांनीही मेहनत घेतली आहे, असे सांगत भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात आई-वडील गुरूंच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी व्हा अशा शुभेच्छा दिल्या.
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले. मुलांच्या कलागुणांनी पालक वर्गाला मंत्रमुग्ध केले.





