कणकवली नगरपंचायत मध्ये भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक साठी बंडू हर्णे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

शहर विकास आघाडीवर “वॉच” ठेवण्यासाठी भाजपचा मोहरा पुन्हा नगरपंचायत मध्ये

20 वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर हर्णे व सत्ताधारी यांच्यामध्ये जुगलबंदी रंगणार

कणकवली नगरपंचायत च्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी अखेर भाजपाकडून माजी उपनगराध्यक्ष व कणकवली नगरपंचायत मधील सत्तेच्या काळातील भाजपाचे अभ्यासू शिलेदार अशी ओळख असलेले गणेश उर्फ बंडू हर्णे यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता कणकवली शहर विकास आघाडीच्या सत्ताधारी पॅनलला टक्कर देण्याकरिता तसेच सत्ताधाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी भाजपाने बंडू हर्णे हे अस्त्र नगरपंचायत मध्ये पुन्हा स्वीकृत नगरसेवक च्या माध्यमातून आणल्याची चर्चा कणकवलीच्या राजकारणात सुरू आहे. 1992 ते 1997 पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्य व त्यानंतर झालेल्या नगरपंचायतीमध्ये 2008 ते 2013, 2013 ते 2018 व 2018 ते 2023 सलग तीन टर्म 15 वर्षे नगरसेवक असा 20 वर्षाचा श्री हर्णे यांचा ग्रामपंचायत ते नगरपंचायत चा अनुभव आहे. बंडू हर्णे हे कणकवली ग्रामपंचायत अस्तित्वात असल्यापासून शहराच्या राजकारणात कार्यरत आहेत. कणकवलीचे ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर कणकवलीचे नगरसेवक अशी अनेक पदे ते भूषवत असतानाच कणकवलीच्या उपनगराध्यक्ष पदावर देखील त्यांनी अभ्यासू पणे काम केले आहे. नगरसेवक व उपनगराध्यक्ष असताना एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. याच स्थितीत या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु भाजपाने कणकवली शहर विकास आघाडी च्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी बंडू हर्णे यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. स्वीकृत नगरसेवक पदाकरता श्री हर्णे यांचे नाव निश्चित झाल्यानंतर त्याबाबतची प्रक्रिया उद्या नगरपंचायतच्या पहिल्या बैठकीमध्ये होणार आहे. त्यामुळे आता येत्या काळात कणकवली शहरात सत्ताधारी शहर विकास आघाडीला टक्कर देण्याकरिता बंडू हर्णे हे नगरपंचायत च्या रिंगणात स्वीकृत नगरसेवक च्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. व यातून सत्ताधारी व हर्णे यांच्यात राजकीय जुगलबंदी देखील रंगणार आहे.

error: Content is protected !!