डिगस येथे “नशामुक्त भारत अभियान – तंबाखूमुक्त युवा अभियान” जनजागृती कार्यक्रम संपन्न

श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी, कुडाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटच्या वतीने व रोटरॅक्ट क्लबच्या सहकार्याने डिगस येथे “नशामुक्त भारत अभियान – तंबाखूमुक्त युवा अभियान” हा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील युवक, विद्यार्थी व नागरिकांमध्ये तंबाखू, गुटखा, सिगारेट, विडी व इतर व्यसनांचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करणे हा होता. तंबाखू सेवनामुळे होणारा तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसाचे विकार, हृदयरोग तसेच सामाजिक व आर्थिक नुकसान याविषयी सविस्तर माहिती NSS स्वयंसेवकांनी दिली.
कार्यक्रमात, घोषवाक्ये, जनजागृती फलक, थेट संवाद व मार्गदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यात आले. युवकांना आरोग्यदायी सवयी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
हा उपक्रम प्राचार्य डॉ. युवराज पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली व NSS समन्वयक प्रा. शंकर मुसळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी NSS उपसमन्वयक प्रा. गणू गावडे व प्रा. सलीना फर्नांडिस व प्राची पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच NSS स्वयंसेवक व रोटरॅक्ट क्लबच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
या अभियानास डिगस गावातील ग्रामस्थ, युवक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक नागरिकांनी तंबाखू सेवन सोडण्याचा संकल्प केला, हे या उपक्रमाचे मोठे यश ठरले.





