जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने भूमिपुत्र न्यायमूर्तींचा १४ ला सत्कार

न्या. अमित जामसंडेकर आणि न्या. श्रीराम शिरसाट यांचा होणार गौरव
न्या. मकरंद कर्णिक, न्या. दिघे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान
सिंधुदुर्ग जिल्हा बार असो तर्फे रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथे जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि नव्यानेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले न्यायमूर्ती अमित जामसंडेकर आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांचा सत्कार होणार आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांचे उच्च न्यायालयातील कामकाज आणि वकिली याबाबत मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. कुडाळ पावशी येथील शांतादुर्गा एसी हॉल येथे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला सिंधदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व वकिलांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे ऍड. संग्राम देसाई यांनी केले आहे. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ऍड. संग्राम देसाई यांनी आज कुडाळ कोर्टच्या बार रूम मध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी सिंधुदुर्ग बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड परिमल नाईक, सचिव ऍड यतिश खानोलकर, उपाध्यक्ष विवेक मांडकुलकर, महिला उपाध्यक्ष ऍड. नीलिमा गावडे, खजिनदार ऍड. गोविंद बांदेकर, ऍड. राजीव बिले, ऍड. अमोल सामंत, ऍड. राजीव कुडाळकर, ऍड. सुनील लोट, ऍड. अविनाश परब, ऍड अमित सावंत, ऍड. राजश्री नाईक, ऍड. हितेश कुडाळकर, ऍड. निखिल गावडे, ऍड. विक्रांत परब, ऍड. दत्ताराम बिले, ऍड. विनय मांडकुलकर, ऍड. रुषांक जाधव, ऍड. सुयश गवंडे आदी वकील उपस्थित होते.
यावेळी बोलताना ऍड. संग्राम देसाई म्हणाले, न्यायमूर्ती अमित जामसंडेकर आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांची नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे. न्या. जामसंडेकर हे मूळ देवगड तर न्या. शिरसाट हे कणकवली तालुक्यातील आहेत. त्यांचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने करण्यात येणार आहे. न्या. सुरेंद्र तावडे यांच्यानंतर जिल्ह्याचे हे दोन्ही भूमिपुत्र मुबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम करत आहेत. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलांनाच नव्हे तर सामान्य माणसाला देखील अभिमान आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. त्यांचे देखील यावेळी ‘उच्च न्यायालयातील कामकाज आणि वकिली’ याबाबत मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. असे ऍड. देसाई म्हणाले.
ऍड. देसाई पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग-रत्नागिरी सह सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर खंडपीठ स्थापन झाले आहे. त्यामुळे या सहा जिल्ह्यातील वकिलांनी तिथे जाऊन प्रॅक्टिस करावी अशी अपेक्षा आहे. पण त्याठिकाणी प्रॅक्टिस करताना कोणत्या अडचणी येतात, तिथे कशी प्रॅक्टिस करावी याबाबतचे मार्गदर्शन न्या. कर्णिक आपल्या व्यख्यानातून करणार आहेत. त्याच बरोबर कोल्हापूर खंडपीठाचे न्या. दिघे साहेब हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. न्या. अमीत जामसंडेकर यांनी उच्च न्यायालयात प्रॅक्टिस कशी करावी याबाबत एक प्रेझेंटेशन देणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विशेषतः तरुण वकिलांनी या कार्यक्रमाला ऊपस्थित राहावे असे आवाहन ऍड. देसाई यांनी यावेळी केले.
ऍड. देसाई पुढे म्हणाले, यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. देशपांडे साहेब, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. परिमल नाईक, उपाध्यक्ष ऍड. विवेक मांडकुलकर आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंत अशा प्रकारचे मार्गदर्शन जिल्हयात झालेले नाही. त्यामुळे या मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील तरुण वकिलांच्या पिढीला मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी मदत होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून निवड होण्य्साठी उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केलेल्या वकिलांचा विचार केला जातो. त्यामुळे हा देखील फायदा वकिलांना होणार आहे. जिल्ह्यातील वकील सुद्धा कोल्हापूर खंडपीठात प्रॅक्टिस करून न्यायमूर्ती पदापर्यंत पोहचू शकतील अशी अशा ऍड. संग्राम देसाई यांनी व्यक्त केली.
जे वकील जिल्ह्यात आणि मुंबई उच्च न्यायालयात चांगली प्रॅक्टिस करतात अशा वरिष्ठ वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यूमूर्ती सिनियर डेसिग्नेटेड काउन्सिल ही पदवी देतात. त्यामुळे अशी नवीन संधी येथील वकिलांना प्राप्त झालेली आहे असे ऍड. संग्राम देसाई यांनी सांगितले. येथील वकिलांची स्पर्धा आता महाराष्ट्र आणि देशातील वकीलांशी होणार आहे. न्या. जामसंडेकर आणि न्या. शिरसाट हे भूमिपुत्र असल्याने त्यांचा सत्कार होत आहे याबरोबरच येथील तरुण वकिलांना त्यातून प्रेरणा मिळावी आणि येथील वकील सुद्धा उच्च पदावर पोहोचावेत हा सुद्धा उद्देश असल्याचे ऍड. देसाई यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकरी आणि सदस्य मेहनत घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त वकिलांनी या कार्यक्रमाला ऊपस्थित राहावे असे आवाहन ऍड. संग्राम देसाई यांनी केले आहे.





