जानेवारीत कुडाळात २८ वा बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव

सहा नाटके, एक दीर्घांक, एकांकिका होणार सादर
७ जानेवारीला नाट्यमहोत्सवाचा शुभारंभ
कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्सच्यावतीने ७ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत कुडाळ येथील बाबा वर्दम रंगमंच येथे ‘बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ७ रोजी सायंकाळी ७ वाजता बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. रोज सायंकाळी ७.३० वाजता या नाटकांचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवाचे हे २८ वे वर्ष आहे. यावर्षी राज्यभरातील नामवंत नाट्यसंघांची सहा नाटके, एक दीर्घाक व एक एकांकिका या नाट्यमहोत्सवात सादर होणार आहेत. पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील नामवंत संघांची नाटके पाहण्याची संधी कुडाळच्या रसिकांना प्राप्त झाली आहे. सर्व नाट्यरसिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य यांनी केले आहे.
बाबा वर्दम थिएटर्स, ही कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील हौशी कलाकारांची नाट्यसंस्था, कुडाळ येथील कै. बाबा वर्दम, कै. वामनराव पाटणकर, कै. शंकरभाई वर्दम, कै. एकनाथजी ठाकूर, कै. प्रकाश पाटणकर यांच्या प्रेरणेने व प्रतिभावंत दिग्दर्शक श्री. चंदू शिरसाट व विद्यमान अध्यक्षा सौ. वर्षा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ५४ वर्षे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात अग्रस्थानी आहे.
रंगभूषामहर्षी कै. बाबा वर्दम यांच्या प्रेरणेने ही नाट्यसंस्था सुरू झाली. कै. बाबा उर्फ सखाराम गमशेट वर्दम यांचा जन्म कुडाळ येथे दिनांक ७ जानेवारी १९०९ रोजी झाला. कै. बाबा हे, हिन्दी-मराठी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील प्रतिभाशाली रंगभूषाकार म्हणून ओळखले जातात. प्रसिध्द दिग्दर्शक कै.व्ही. शांताराम यांच्या राजकमल कलामंदिचे ते रंगभूषाकार, त्यांनीच ‘झनक झनक पायल बाजे’ या अजरामर चित्रपटातील कलाकारांची रंगभूषा केली होती. आजही त्यांचे नाव मराठी नाट्य-चित्र क्षेत्रात ‘रंगभूषामहर्षी’ म्हणून आदराने घेतले जाते. त्यांच्या सन्मानार्थ अखिल भारतीय मराठी नाटयपरिषदेतर्फे दरवर्षी ‘उत्कृष्ट रंगभूषाकार हा पुरस्कार देण्यात येतो. बाबा वर्दम यांच्या मृत्यूनंतर या नाट्यसंस्थेचे नामकरण ‘बाबा वर्दम थिएटर्स’ असे करण्यात आले.
सन १९९९ पासून बाबा वर्दम थिएटर्स, कै. बाबा वर्दम यांचे नांवे ‘कै. बाबा वर्दम स्मृती आंतरराज्य नाट्यस्पर्धा’ आयोजित करण्यात येत होती. सन २०१५ पासून संस्थेने स्पर्धेचे स्वरुप बदलून नाट्यमहोत्सव सुरु करण्यात आला. या उपक्रमाचे हे २८ वे वर्ष असून यावर्षी राज्यभरातील नामवंत संघांची ७ उत्तम नाटके या नाट्यमहोत्सवात सादर होणार आहेत.
यावर्षी हा नाट्यमहोत्सव दि. ७ जानेवारी ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वा. बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ च्या अध्यक्षा सौ. वर्षा वैद्य यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.
महोत्सवाचे हे २८वे वर्ष असून या महोत्सवाने महाराष्ट्रभर स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले आहे. कुडाळचे सांस्कृतिक वैभव ठरलेल्या या महोत्सवाचे उत्तम व्यवस्थापन हे खास वैशिष्ट्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती झाली असून, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ही या महोत्सवाची आणखी एक जमेची बाजू आहे. गेल्या २७ वर्षात महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा येथील नामवंत नाट्यसंघांनी या स्पर्धेत आपली नाटके सादर केली आहेत. यावर्षीही पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील नामवंत संघांची नाटके पहाण्याची सूवर्णसंधी कुडाळच्या रसिकांना प्राप्त झाली आहे. सर्व नाट्यरसिकांनी या महोत्सवाचा लाभघ्यावा असे आवाहन बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा सौ. वर्षा वैद्य यांनी केले आहे.
नाट्यमहोत्सव कार्यक्रम
नाट्यमहोत्सवात सादर होणारी नाटके पुढीलप्रमाणे आहेत. ७ रोजी तपस्या (सावंतवाडी) निर्मित ‘संगीत होनाजी बाळा’ (लेखक-चिं. य. मराठे, दिग्दर्शक-अभय मुळये), ८ रोजी मन्वंतर कला अकादमी (मुंबई) निर्मित ‘कुणाच्या खांद्यावर’ (लेखक-डॉ. वासुदेव विष्णुपुरीकर, दिग्दर्शक-चिंतू वालकर), ९ रोजी स्नेह (पुणे) निर्मित ‘देवी’ (लेखक व दिग्दर्शक-योगेश सोमण), बाबा वर्दम थिएटर्स (कुडाळ) निर्मित ‘वन सेकंदूस लाईफ’ (लेखक-योगेश सोमण, दिग्दर्शक- साहिल देसाई, शोण घुर्ये), १० रोजी आमचे आम्ही (पुणे) निर्मित ‘एकेक पान गळावया’ (लेखक-डॉ. समीर मोने, दिग्दर्शक-युसूफ अली शेख), ११ रोजी अखिल नाट्य महाराष्ट विद्यामंदिर समिती (सांगली) निर्मित ‘दिनकर पुरोहितचा खून’ (लेखक-चं. प्र. देशपांडे, दिग्दर्शक-डॉ. दयानंद नाईक), १२ रोजी जाणीव चॅरिटेबल फाऊंडेशन संचलित आनंदरंग (कोल्हापूर) निर्मित ‘भांडा सौख्यभरे’ (लेखक व दिग्दर्शक-विपुल देशमुख), १३ रोजी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान (कणकवली) निर्मित ‘साठा उत्तराची कहाणी’ (लेखक-विक्रम भागवत, दिग्दर्शक-कै. रघुनाथ कदम, सुहास वरुणकर).





