खारेपाटण – बंदरवाडी येथे राहत्या घराला आग

महसूलकडून करण्यात आला पंचनामा

सुमारे साडेतीन लाखाचे नुकसान

खारेपाटण – बंदरवाडी येथील विनायक धोंडू पिसे यांच्या राहत्या दुमजली घराला आग लागून लाखोचे नुकसान झाले आहे. हि घटना सोमवारी सकाळी साडेदहा च्या सुमारास घडली. सुदैवाने घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना कोणतीही दुखापत झाली नाही. परंतु घरातील फर्निचर व इतर साहित्य सहित संपूर्ण छप्पर जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सदर आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील बंदर वाडी मधील विनायक धोंडू पिसे यांच्या मालकीचे दुमजली घर असून या घराला सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. सदर घराच्या वरच्या मजल्यावर कोणीही व्यक्ती नसल्याने सदर लागलेली आग लक्षात आली नाही. परंतु काही वेळाने घराच्या छपरा मधून धुराचे लोट निघू लागल्याने बाजूला मजूर कामगार करणाऱ्या महिलांनी ही आग निदर्शनास आणून दिली. आग लागल्याचे लक्षात येताच बंदर वाडी डी येथील सामाजिक कार्यकर्ते गौरव ढेकणे यांनी तात्काळ धाव घेऊन इतर स्थानिकांशी संपर्क साधला. गौरव देखणे यांच्यासहित सदर घटनास्थळी स्थानिक रहिवाशी श्री. रवींद्र चव्हाण, संतोष चव्हाण अवधूत ढेकणे, आदित्य पिसे, रमेश ढेकणे, सोमेश्वर पिसे यांनी तात्काळ धाव घेऊन ही आग विझवण्याचा प्रयत्न केला व पुढील अनर्थ टळला. तरीही या आगीमध्ये घरचं छप्पर, फर्निचर, टीव्ही, कपाट, कपडे, पलंग व घरातील इतर साहित्य जळून खाक झाले.
बागेतील फवारणी पंपाचा वापर सदर घराला आग लागल्या नंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अग्निशामक बंब पोहोचण्याची सुविधा नसल्याने स्थानिकांनी तात्काळ प्रसंगावधानाने बागेतील फवारणी पंप उपलब्ध करून या पंपाच्या सहाय्याने कसोशीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. हाती पाण्याचा मारा करून आग आटोक्यात येत नसल्याने या पंपामुळे आगीचा पुढील होणारा प्रकोप टाळण्यात आला. या तरुणांच्या धैर्य मुळे या घराची मोठी होणारी हानी टळल्याने या सर्वांचे कौतुक करण्यात येत आहे.
सदर आग लागल्याची बातमी समजतात खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच महसूल मंडळ अधिकारी श्रीमती सरिता बावलेकर तसेच ग्राम महसूल अधिकारी कृष्णा लूडबे आणि महसूल सेवक प्रथमेश गुरसाळे यांनी स्थानिक रहिवासी श्री. योगेश गोडवे व श्री. नंदकिशोर कोरगावकर यांच्या सहकार्याने पंच यादी करून प्रशासकीय दरबारी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

error: Content is protected !!