कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांना दिलेले पोलीस संरक्षण कमी करा!

माजी आमदार वैभव नाईक यांची गृहमंत्री, पोलीस अधीक्षक व निवडणूक आयोगाकडे मागणी
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांना वाय आणि एस स्कॉर्ड दर्जाचे पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. गरज नसतानाही निलेश राणेंना मोठ्या स्वरूपाचे पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक आचार संहिता सुरु असून निवडणुकीची धामधूम सुरु आहे. असे असताना निलेश राणे हे आपल्याकडील वाय आणि एस स्कॉर्ड दर्जाच्या पोलीस संरक्षणाचा वापर बेकायदेशीररित्या मतदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी करीत आहेत. अशा आशयाची तक्रार माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग व राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, अतिरिक्त असलेल्या पोलीस संरक्षणातून क्रेझ निर्माण करून मतदारांवर प्रभाव पाडत आहेत. पोलिसांच्या अतिरिक्त गाड्यांमुळे ग्रामीण भागात निलेश राणेंचा ताफा गेल्या नंतर विनाकारण पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजवले जात असल्याने स्थानिक मतदारांना त्याचा त्रास होत आहे. तसेच ग्रामीण भागात अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीची समस्या देखील होत आहे. निलेश राणे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्यास माझी कोणतीही हरकत नाही. परंतु त्यांना गरजेपेक्षा अतिरिक्त स्वरूपात दिलेले एस स्कॉर्ड पोलीस संरक्षण कमी करण्यात यावे.
कणकवली प्रतिनिधी





