आंबा बागायतदारांचा मोर्चा पालकमंत्री दडपून टाकण्याची भाषा करत आहेत!

आंबा बागायतदार यांचा प्रश्न पालकमंत्र्यांनी अधिवेशनात मांडायला हवा होता
युवासेना जिल्हाप्रमुख कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांचा टोला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आंबा आणि काजू पिकाचे सुमारे ८० ते ८५ टक्के नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी भरपाई मिळावी म्हणून देवगडसह जिल्ह्यातील शेतकरी तथा आंबा, काजू बागायतदार आवाज उठवत आहेत. मात्र शासन कोणतीही दखल घेत नसल्याने अखेर १२ मार्च रोजी जिल्हाव्यापी मोर्चा काढण्याचे निश्चित झाले. शासनाविरोधात प्रचंड मोर्चा निघणार हे समजताच, बुडाखाली आग लागल्यासारखे पालकमंत्री धावाधाव करत आहेत. नुकसानग्रस्त बागायतींची पाहणी करत आहेत. एवढेच नव्हे तर मोर्चा दडपून टाकण्याची भाषा बोलत आहेत अशी टीका युवासेना जिल्हाप्रमुख तथा कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी आज केली.
येथील उपनगराध्यक्ष दालनात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक जयेश धुमाळे उपस्थित होते.
ते म्हणाले, यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा आणि काजू बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. मोहोर काळा पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली नाही. परिणामी आंबा आणि काजू पिकाचे सुमारे ८० ते ८५ टक्के नुकसान झाले आहे. याबाबतचा नजरपाहणी अहवाल कृषी विभागाने राज्य शासनाला सादर केला आहे. मात्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाही बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याबाबत कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
गतवर्षी जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकावर थ्रिप्स रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी बागायतदारांनी लाखो रुपये खर्च करून कीटकनाशकांची फवारणी केली. मात्र ही कीटकनाशके बोगस ठरली आणि त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्या वेळी आंदोलन झाल्यानंतर तत्कालीन आमदार व विद्यमान पालकमंत्र्यांनी बोगस कीटकनाशकांचे पैसे देऊ नका, असे आवाहन केले होते. तरीही कीटकनाशक पुरवठादार कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून संपूर्ण रक्कम वसूल केल्याचा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, गेल्या महिनाभरापासून बागायतदार नुकसानभरपाईसाठी सातत्याने मागणी करत आहेत. मात्र शासनाकडून कोणताही निर्णय होत नाही. त्यामुळे शेतकरी आणि बागायतदारांमध्ये असंतोष वाढत आहे. देवगडमधून या आंदोलनाची सुरुवात झाली असून त्याला सर्व पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. १२ मार्च रोजी मोर्चाची तारीख देखील निश्चित झाली आहे.
सिंधुदुर्गातील आंबा बागायतदारांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी देखील जिल्ह्यात येऊन गेले होते. त्यांनीही शासनाने तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी, अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांच्या वक्तव्यावरून पालकमंत्री संतप्त होताना दिसत आहेत आणि आंबा बागायतदारांचा मोर्चा दडपण्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप नाईक यांनी केला. प्रत्यक्षात पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न विधिमंडळात मांडायला हवा होता, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा अध्यादेश काढला असला तरी सिंधुदुर्गात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ही केंद्रे ग्रामपंचायतीच्या जागेत उभारली जाणार असून त्या जागेचे भाडे शासनाकडून दिले जाते. मात्र जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच असल्याने या केंद्रांच्या उभारणीबाबत चालढकल केली जात असल्याचा आरोप नाईक यांनी केला. यामुळे बागायतदारांना अचूक हवामान माहिती मिळत नसल्याने त्याचा मोठा फटका बसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.





