शिडवणे नं. १ शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न; यशस्वी महिला व माता पालकांचा सन्मान

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिडवणे नं. १ शाळेमध्ये महिलांचा विशेष गौरव आणि सन्मान सोहळा सोमवारी अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेतील माता पालक, शिक्षण क्षेत्रातील यशस्वी महिला आणि अंगणवाडी सेविकांचा गौरव करण्यात आला.
माता पालकांचा सक्रीय सहभाग यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या मनाली धुमाळ, अन्वी येतकर, समिता सुतार, स्नेहा पांचाळ, मेघना सुतार, योगिता सुतार यांच्यासह अंगणवाडी सेविका प्रियांका पाटणकर व मदतनीस कविता केतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्व उपस्थित महिलांचे स्वागत केले आणि महिलांच्या समाजातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रबोधनपर विचार आणि सांस्कृतिक कार्यक्रम
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन उपमुख्याध्यापिका वेदिका चव्हाण यांनी केले. उपस्थित माता पालकांनी विविध विषयांवर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. यामध्ये अन्वी येतकर, स्नेहा पांचाळ आणि समिता सुतार यांनी ‘निपुण भारत अभियान’, ‘महिला दिनाचे महत्त्व’ आणि ‘मुलांचा अभ्यास’ या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच, समिता सुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पोवाडा सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थिनी शफा शेख आणि स्वानंदी कुबल यांनी ‘आई’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली.
सन्मान सोहळा
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे उपस्थित सर्व महिलांचा केलेला सत्कार. सर्व माता पालकांना आणि अतिथींना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ‘निपुण सखी’ प्रमाणपत्र देऊन समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. तसेच, शाळेतील उपमुख्याध्यापिका वेदिका चव्हाण आणि पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
शेवटी, मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्व उपस्थित महिलांचे आभार मानले. या कार्यक्रमामुळे शाळा आणि पालक यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास मदत झाली, अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या.





