कुडाळ पं. स. सभापती-उपसभापती पदासाठी फक्त महायुतीकडूनच अर्ज

सभापती पदासाठी मिलिंद नाईक यांचा अर्ज

उपसभापती पदासाठी सीताराम तेली यांचा अर्ज

कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक तर उपसभापतीपदासाठी भाजपचे सिताराम तेली यांनी आज आपले नामनिर्देशन पत्र पंचायत समिती कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केले. पाच पं.स. सदस्य असलेल्या ठाकरे शिवसेना या निवडणुकीपासून दूर राहीली आहे. त्यामुळे महायुतीतर्फे सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक-एकच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आल्याने, दोघांचीही बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दुपारी तीन वाजल्यापासून होणा-या निवडणुक प्रक्रियेनंतर सभापती व उपसभापती पदाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
कुडाळ पं.स. त महायुतीचे वर्चस्व असून भाजपाचे सात, शिंदे शिवसेनेचे सहा तर ठाकरे शिवसेनेचे पाच असे एकूण अठरा सदस्यांचे संख्याबळ आहे. महायुतीच्या फाॅर्म्युल्यानुसार सभापती पदासाठी शिंदे शिवसेनेचे साळगाव पं.स.सदस्य मिलिंद नाईक तर उपसभापती पदासाठी भाजपाचे झाराप पं.स.सदस्य सिताराम तेली यांची नावे पक्ष श्रेष्ठींकडून निश्चित करण्यात आली. त्यानंतर महायुतीतर्फे नाईक व तेली यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अमरसिंह जाधव, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आदी उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शिंदे शिवसेनेचे माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते व काका कुडाळकर, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे, शिवसेना जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.सदस्य दादा साईल, जि.प.सदस्य दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर व रूपेश कानडे, पं.स. सदस्य मंगेश प्रभू, बाळकृष्ण मडव, निखिल कांदळगावकर आदींसह महायुतीचे सर्व पं.स.सदस्य उपस्थित होते.
दरम्यान तीन वाजल्यापासून नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रकिया व त्यानंतर मागे घेणे, नंतर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या निवडीची केलळ अधिकृत घोषणा बाकी आहे.

error: Content is protected !!