…तर आंबा बागायतदार जशासतसे उत्तर देतील !

जि. प. सदस्य संजय गावडे यांचा इशारा
कुडाळ मध्ये आंबा बागायतदारांनी पत्रकार परिषद
आंबा बागायतदार तसेच जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांनी आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पालकमंत्र्यांना चुकीचे मार्गदर्शन केले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. आंबा बागायतदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
कुडाळ एमआयडीसी येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काका ढोके, किरण टेंभूलकर, गणेश गावकर, प्रशांत तेली, पिंटू गावडे, रतन तेली, पांडुरंग गावडे, विजय सरनोबत आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा हा आंबा उत्पादक जिल्हा आहे. यावर्षी आंबा बागायतदार चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेत होते; मात्र वातावरणातील बदलामुळे आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात खाक झाला आहे. त्यामुळे यंदा केवळ पाच ते दहा टक्केच उत्पादन मिळण्याची शक्यता असून आंबा बागायतदार शेतकरी हतबल झाले आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेले अनेक लोकही चिंतेत आहेत. एकूणच कोकणातून हापूस आंब्याचे अस्तित्व धोक्यात येईल का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे गावडे यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे आम्ही प्रत्येक वेळी नुकसानभरपाई मागत नाही. मात्र तेथील लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात, अशी परिस्थिती आमच्याकडे नाही. यावर्षी सरकारने आंबा बागायतदारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आमच्या हापूस आंब्यांचा आनंदाने आस्वाद घेणारे लोक आज आमच्या आंदोलनाला विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुठभर लोकांना हाताशी धरून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करू नये. कोकणातील माणूस हा फणसासारखा आहे, आतून गोड, पण बाहेर काटे आहेत हे लक्षात ठेवा,” असा इशाराही त्यांनी दिला.
गेल्या अनेक वर्षांपासून केवळ आश्वासने ऐकत आहोत. आता पोकळ वल्गना नकोत. जनता आता जागरूक झाली आहे. पैशाचे राजकारणही चालणार नाही, असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील सर्व सोसायटी चेअरमननी आंदोलनाला पाठिंबा द्यावा. जे चेअरमन आंदोलनात सहभागी होणार नाहीत, त्यांना आंबा बागायतदारांनी पदावरून हटवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या आंदोलनाला सुरुवातीपासून राजू शेट्टी यांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पालकमंत्र्यांना चुकीचे मार्गदर्शन केले जात असल्याचा आरोप करून आंबा बागायतदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.आंबा बागायतदारांनी डगमगून न जाता आगामी मोर्चाला मोठ्या संख्येने पाठिंबा द्यावा, असे आवाहनही संजय गावडे यांनी केले.





