कणकवली शहर विकास आघाडी धोक्यात?

शिंदे शिवसेनेचे काही प्रमुख पदाधिकारी पालकमंत्र्यांच्या भेटीला
संदेश पारकर सावध पवित्र्यात? नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बदलला जाण्याची चर्चा
कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेबरोबर अन्य मित्र पक्ष एकत्र येत कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविली जाणार असल्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते. खात्रीशीर सूत्रांकडून तशी माहिती देखील प्राप्त झाली आहे. मात्र आज दिवसभरात वेगवान घडामोडी घडत आज रात्री काही वेळा तुम्ही शिंदे सेनेच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवलीतील यांचे निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे कणकवलीत होऊ घातलेली संभाव्य शहर विकास आघाडीचे भवितव्य धोक्यात आली आहे. शहर विकास आघाडी यशस्वी न झाल्यास सावध पवित्रा घेतलेले माझी नगराध्यक्ष संदेश पारकर हे आपली नगराध्यक्ष उमेदवारी लढवण्याबाबतची भूमिका बदलू शकतात अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात वर्तवली जाऊ लागली आहे. कणकवली शहरात नगरपंचायत निवडणुकीसाठी हो घातलेले संभाव्य शहर विकास आघाडीचे 17 उमेदवार अगोदर निश्चित केले जाणार आहेत. व त्यानंतरच संदेश पारकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल अशी देखील माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मात्र तासागणिक राजकीय गणिते बदलत असल्याने या संपूर्ण स्थितीबाबत अद्याप आपला निर्णय जाहीर करणे हे सद्यस्थितीत शहर विकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना कठीण बनले आहे. नुकत्याच संदेश पारकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान या निवडणुकीत एक दिलाने काम करा कोणतेही हवे दावे उमेदवार निवडी वेळी राहता नये. एका वार्डात एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असल्याने त्या ठिकाणी मागील निवडणुकीसारखा नाराजीचा फटका बसू नये याची काळजी घ्या. अशा सूचना देखील संदेश पारकर यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र या दरम्यानच महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी स्वबळाची भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुती भक्कम झाल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले व त्यानंतर सिंधुदुर्गात देखील महायुती करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. हे सर्व सुरू असतानाच आज पालकमंत्री नितेश आणि भाजपाचे पक्ष निरीक्षक प्रमोद जठार तसेच शिवसेनेचे नेते माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांची ओरोस येथील भाजपा कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्या बैठकीनंतर आत्ता काही तासांपूर्वी कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी पालकमंत्र्यांसोबत शिवसेनेच्या कणकवलीतील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामुळे आता कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी मध्ये शिंदेंची शिवसेना असणार की शिंदेंच्या शिवसेनेला भाजपा महायुतीमध्ये सामील करून घेणार ते पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली नगरपंचायत ची निवडणूक ही हाय व्होल्टेज होणार हे यापूर्वीच निश्चित झाले असल्याने शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र संदेश पारकर यांनी अद्याप भूमिका स्पष्ट करण्यास नकार दर्शवल्याने कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या नावावर जरी शिक्कामोर्तब करण्यात आले तरी आता शहर विकास आघाडी किंवा ती न झाल्यास महाविकास आघाडी चा ऐनवेळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बदलला जाण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दोन दिवसापूर्वी नगराध्यक्ष पदासाठी नवीन चेहरा असणार असे संकेत दिले होते. संदेश पारकर यांचे नाव चर्चेत ठेवून ऐनवेळी नवीन चेहरा म्हणून अन्य कुणाचे नाव समोर येते का? ते देखील येत्या काळात पाहणे महत्त्वाचे असणार आहे. परंतु सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शहर विकास आघाडीच्या 17 जागांवर उमेदवारांकरीता नाव निश्चिती जवळपास अंतिम टप्प्यात आली असून काही इच्छुक उमेदवार आणि कागदपत्र गोळा करण्यास देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात निर्णायक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली





