कणकवली निवडणुकीत आम आदमी पक्ष काँग्रेससोबत!

महाविकास आघाडीमध्ये फूट सुरूच
समविचारी पक्षांसह तिसऱ्या आघाडीवर उद्या होणार चर्चा
जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांची माहिती
नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली मतदारसंघात राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. आम आदमी पक्षाने काँग्रेससह समविचारी पक्षांसोबत तिसरी आघाडी उभी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या आघाडीबाबतचा विचारविनिमय उद्या (बुधवार) होणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी दिली.
ताम्हणकर यांनी सांगितले की, “कणकवलीतील जनतेसमोर प्रामाणिक, विकासाभिमुख आणि स्वच्छ राजकारणाचा पर्याय निर्माण करणे हे आम आदमी पक्षाचे उद्दिष्ट आहे. यासाठी काँग्रेस आणि इतर समविचारी पक्षांसोबत एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीची शक्यता तपासली जात आहे.”
याच अनुषंगाने बुधवारी शहरातील प्रमुख नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विस्तृत चर्चा होणार असून, या बैठकीत आघाडीची प्राथमिक रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. तसेच या तिसऱ्या आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारात आम आदमी पक्ष सक्रियपणे सहभागी होणार असल्याचेही ताम्हणकर यांनी स्पष्ट केले.
स्थानिक राजकारणात या घडामोडीमुळे नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली असून, मतदारसंघातील निवडणुकीचे वातावरण आणखी चुरशीचे होण्याची चिन्हे आहेत.
कणकवली प्रतिनिधी





