हुमरस येथे त्रास देणाऱ्या वानराला वनविभागाने केले जेरबंद

जलद बचाव पथकाची कामगिरी
कुडाळ : तालुक्यात हुमरस वारंगवाडी येथे गेले १५ दिवस आपल्या मर्कटलीलांनी हैराण करणाऱ्या एका वानराला दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर वनविभागाच्या जलद बचाव पथकाने शिताफीने जेरबंद केले.
हुमरस वारंगवाडी येथे गेले १५ दिवस एक वानर दुकानात शिरत होता. गाड्यांचे आरसे तोडून काढत होता. वारंग वाडीतील ग्रामस्थ त्यामुळे त्रस्त आणि भयभीत झाले होते. सरपंच यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तात्काळ त्यांनी वनक्षेत्र कुडाळ, वनपाल श्री सावंत यांना फोन वरून घटनेची माहिती दिली. श्री सावंत यांनी घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन जलद बचाव पथकाचे श्री. गावडे यांना या बाबत माहिती देऊन तात्काळ वानराला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याचे आदेश दिले. दुसऱ्याच दिवशी बचाव पथक वनरक्षक प्रसाद पाटील यांच्या सोबत हुमरस गावात दाखल झाले. परिसराची पहाणी करून पिंजरे स्थानिकांच्या मदतीने एका जागेवर सेट करण्यात आले. पण त्या वानराने पिंजऱ्याच्या दिशेला जायचेच टाळले. दोन दिवस तो वानर बचाव पथकाला पण गुंगारा देऊन गाड्यांचे आरसे काढत होता. स्थानिकांनीही वानराला पकडायची आशा आता सोडून दिली होती,
तिसऱ्या दिवशी मात्र बचाव पथकाने दुपारी मोठया शिताफिने शेवटी त्या वानराला पिंजऱ्यात कैद केले. स्थानिकांनी देखील जलद बचाव पथकाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. हे बचाव कार्य माननीय वनक्षेत्रपाल संदीप कुंभार कुडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
जलद बचाव पथकात, अनिल गावडे, वैभव अमृस्कर, प्रसाद गावडे, दिवाकर बांबर्डेकर, सुशांत करंगुटकर यांचा समावेश होता. तर हुमरस गावचे सरपंच सीताराम तेली, उप सरपंच प्रविण वारंग, सुजय वारंग, प्रकाश वारंग उपस्थितीत होते.





