स्वबळाच्या घोषणेनंतर कणकवली काँग्रेसची आज बैठक

महाविकास आघाडी बाबत तोडगा निघणार की स्वतंत्र लढण्याचा निर्णय कायम राहणार याकडे लक्ष
10 नंबर प्रभाग पुन्हा एकदा नगरपंचायत निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार
कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुका काँग्रेसची निवड महत्त्वाची बैठक आज कणकवलीत काँग्रेस कार्यालयात होणार आहे. काँग्रेसने महाविकास आघाडी मधून बाहेर येत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसच्या आजच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी कालच काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे सांगत नगराध्यक्ष पदासह काँग्रेस 17 ही प्रभागांमध्ये उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय आजच्या बैठकीत घेतला जाणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मधून काँग्रेस बाहेर पडल्यास काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरे गट राजकीय कात्रीत सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान एकीकडे महायुती मधील शिंदे शिवसेनेला कणकवलीत भाजपने सोबत घेतलेले नसतानाच महायुतीत बिघाडी झाल्यानंतर आता त्या पाठोपाठ कणकवली शहरात महाविकास आघाडीमध्ये देखील बिघाडी झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासोबत किती जागांवर तडजोड करणार? काँग्रेसची मागणी ठाकरे शिवसेना मान्य करणार का? कणकवली शहर विकास आघाडी झाल्यास शिंदे शिवसेनेची होऊ घातलेली संभाव्य एन्ट्री काँग्रेसला रुचणार का? ते पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडी किंवा शहर विकास आघाडी म्हणून संदेश पारकर यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी निश्चित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे पुन्हा एकदा या निवडणुकीचा चेंडू काँग्रेसच्या गोटात आला होता. त्यामुळे काँग्रेसची आजच्या बैठकीतील भूमिका महत्त्वाची असणार असून, काँग्रेसच्या बैठकीनंतर काय भूमिका मांडली जाणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये कणकवली नगरपंचायत मध्ये दहा नंबर प्रभाग हा महत्त्वपूर्ण ठरला होता. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर हे या प्रभागांमध्ये असल्याने त्यांचा या प्रभागासहित अजून काही प्रभागांच्या जागांवर दावा आहे. त्यामुळे या निवडणुकीत देखील 10 नंबर प्रभाग हा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.





