पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘व्यसनमुक्त गड- किल्ले संवर्धन मोहिमेचा’ होणार सिंधुदुर्गातून शुभारंभ!

११ ऑक्टोबरला रेडी येथील यशवंतगडावर पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मॅडम तसेच मोहन दहिकर पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे व्यसनमुक्ती संवर्धन करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ ११ ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी १० वाजता वेंगुर्ले तालुक्यातील यशवंतगड, रेडी येथे होणार आहे. हा उपक्रम नशामुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हा नशामुक्त भारत अभियान समिती, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, जिल्हा पोलीस विभाग, दुर्गा मावळा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांचा सहभागने व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आयोजनातून राबवण्यात येणार आहे. यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक गडकिल्ल्यांवर अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

जगाच्या नकाशावर ऐतिहासिक वारसा स्थळे असणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील गड-किल्ले हे शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी प्रेरणादायी स्थळे असली तरी सध्या अनेक ठिकाणी नशेच्या पदार्थांचा वापर व अस्वच्छता वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर गडकिल्ले व्यसनमुक्त करून ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्ह्यात नशाबंदी मंडळाच्या वतीने अमली पदार्थविरोधी जनजागृती सुरु आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि सामाजिक संस्थांबरोबर मिळून या चळवळीला नवा वेग देण्यासाठी ही मोहीम सुरु करण्यात येत आहे.
पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या शुभारंभ सोहळ्यासाठी शिवप्रेमी, युवक, महिला बचतगट व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांच्याकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!