खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास प्रारंभ

राज्यातील ग्रामपंचायतीच्या विकासाला चालना देऊन त्यांच्या कार्यक्षमतेनुसार त्यांना प्रोत्साहन देणे व आर्थिक बळकटी देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यभर सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावात ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामस्थांची विशेष सभा घेऊन प्रारंभ करण्यात आला.
सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेला माजी सरपंच श्री रामकांत राऊत, श्री. किशोर माळवदे, सामाजिक कार्यकर्ते श्री. मंगेश गुरव, श्री. महेश कोळसुलकर, श्री. संतोष पाटणकर,श्री सुहास राऊत, श्री. प्रकाश मोहिरे यांनसह माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. प्रणय गुरसाळे, ग्रा. पं. सदस्य श्री सुधाकर ढेकणे, श्री. जयदीप देसाई, किरण कर्ले, सौ. क्षितिजा धुमाळे, सौ. मनाली होणाळे, सौ. दक्षता सुतार, ग्रामविकास अधिकारी श्री.विशाल वरवडेकर, तलाठी श्री. प्रवीण लुबडे आरोग्य सहाय्यक श्री. वानोळे, आरोग्य सेवक श्री. गेडाम आदी मान्यवर ग्रामस्थ, अधिकारी व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री विशाल वरवडेकर यांनी मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचा शासनाचा उद्देश नागरिकांना पटवून दिला. तर या उपक्रमा अंतर्गत गावात प्राधान्याने कोणकोणती कामे लोकसहभातून करता येतील याबद्दल नागरिकांना माहिती दिली. या अभियानाच्या माध्यमातून गाव स्वच्छ व समृद्ध करण्यासाठी वाडी वस्त्यांमध्ये विविध जनजागृतीचे कार्यक्रम राबवून खारेपाटण ग्रामपंचायत जिल्ह्यासह राज्यात पुढे आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून त्यासाठी नागरिकांना या अभियानास सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच सौ. प्राची ईसवलकर यांनी नागरिकांना केले.




