सफाई मित्रांच्या आरोग्याची नगरपंचायतीकडून काळजी

कुडाळात विशेष आरोग्य तपासणी शिबिर

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाच्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने सफाई मित्र आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी ३० सप्टेंबर रोजी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘स्वच्छतेच्या दूतांच्या आरोग्याची काळजी, हीच खरी समाजसेवा’ या भावनेतून आयोजित या शिबिरात सफाई कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिरात रक्त नमुना तपासणी, रक्तदाब आणि मधुमेह तपासणी करण्यात आली. दैनंदिन स्वच्छता कामाच्या स्वरूपामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य व्यावसायिक आरोग्य धोक्यांबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यात आली.
तसेच केंद्र सरकारच्या ‘नमस्ते’ (NAMASTE) योजनेअंतर्गत आयुष्मान भारत कार्ड, ई-श्रम कार्ड आणि विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ कसा मिळवता येईल, याबाबतही सफाई मित्रांमध्ये जनजागृती करण्यात आली. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या सफाई मित्रांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

error: Content is protected !!