कुडाळात डॉ. महेश अभ्यंकर यांचे ३ ऑक्टोबरला JEE, NEET, MHT-CET मार्गदर्शन व्याख्यान

विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी मोफत मार्गदर्शन

नावनोंदणीचे आवाहन

बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सेंट्रल स्कूल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने JEE, NEET आणि MHT-CET परीक्षांच्या तयारीसंदर्भात सुप्रसिद्ध औषधतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. महेश अभ्यंकर यांच्या मोफत मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी बॅरिस्टर नाथ पै शैक्षणिक भवन, कुडाळ येथे होणार आहे.
योग्य मार्गदर्शन, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन ही यशाची गुरुकिल्ली लक्षात घेऊन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या पुढाकाराने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. JEE, NEET आणि MHT-CET परीक्षांची तयारी, अभ्यासाचे नियोजन, परीक्षेतील आव्हाने तसेच विद्यार्थ्यांचे समुपदेशन याबाबत डॉ. अभ्यंकर मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. महेश अभ्यंकर यांनी जी.एस. मेडिकल कॉलेज व केईएम हॉस्पिटल, मुंबई येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून, मुंबईतील नामांकित रुग्णालयांमध्ये OPD, वॉर्ड आणि ICU मध्ये कामाचा अनुभव आहे. क्लिनिकल रिसर्च, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग आणि डिझाइन थिंकिंग या क्षेत्रांतही त्यांनी पदव्या व प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. फार्मा क्षेत्रात विविध नामांकित कंपन्यांमध्ये CEO स्तरापर्यंत त्यांनी काम केले आहे.
डॉ. अभ्यंकर यांनी आतापर्यंत १७०० हून अधिक वैद्यकीय व सामाजिक विषयांवर व्याख्याने दिली असून, ६ हजारांहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना JEE, NEET व CET परीक्षांबाबत समुपदेशन केले आहे. तसेच ते ‘EmoZeal’ आणि ‘RANK’ या पुस्तकांचे लेखक आहेत. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते समाजसेवेतही कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ५० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
या मोफत मार्गदर्शनाचा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे करण्यात आले आहे. इच्छुकांनी नावनोंदणीसाठी बेला सामंत यांच्याशी ७५१७४५९६४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

error: Content is protected !!