खेळाडूंना आवश्यक सुविधा देण्यासाठी बैठक घेणार – आमदार निलेश राणे

कुडाळमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणीचे उद्घाटन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावे, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे. कबड्डी खेळाच्या विकासासाठी आवश्यक सुविधा आणि गरजा याबाबत कबड्डी फेडरेशन व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन चर्चा करावी. यासाठी लवकरच बैठक घेऊन जिल्ह्यातील खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे केले.
सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने, आमदार निलेश राणे यांच्या सहकार्याने आणि कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या आयोजनाखाली कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर कुमारी गटातील विद्यार्थिनींसाठी सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले.
यावेळी संस्थेचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सहकार्यवाह अनंत वैद्य, मुख्याध्यापक विपिन वराडे, उपमुख्याध्यापक रंजन तेली, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, शहरप्रमुख अभिषेक गावडे, कबड्डी फेडरेशनचे तुषार साळगावकर, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, रेवती राणे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. शिक्षणाबरोबरच खेळालाही महत्त्व दिले पाहिजे. सिंधुदुर्गातील तालुका आणि जिल्हास्तरावरील खेळाडूंनी राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावे, यासाठी त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
कबड्डीसारख्या पारंपरिक आणि लोकप्रिय खेळाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी फेडरेशन व असोसिएशनने आवश्यक पायाभूत सुविधांची माहिती लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवावी. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या सोबत आहोत; मात्र आवश्यक सुविधा काय आहेत, याबाबत तुम्ही आमच्याशी संवाद साधला नाही तर त्या गरजा आम्हाला कशा समजणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
लवकरच यासंदर्भात बैठक घेऊन खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक तसेच शासनस्तरावरून मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असेही आमदार राणे यांनी सांगितले.






