कारिवणे, आवळेगावात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून भातपिकाच्या नुकसानीची पाहणी

शुभांगी साठे यांनी डीसीएस पीक पाहणीचा घेतला आढावा
शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद
तालुक्यातील कारिवणे आणि आवळेगाव येथे सिंधुदुर्गच्या अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन भातपिकाच्या नुकसानीची पाहणी केली. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतानाच त्यांनी डीसीएस (डिजिटल क्रॉप सर्व्हे) अंतर्गत सुरू असलेल्या पीक पाहणीचीही माहिती घेतली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी साठे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि पीक नुकसानीची माहिती जाणून घेतली. ई-पिक पाहणीअंतर्गत डीसीएस प्रणालीद्वारे पिकांच्या नोंदी योग्य पद्धतीने केल्या जात आहेत का, याचीही त्यांनी खातरजमा केली.
या पाहणीवेळी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी तसेच स्थानिक शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते. पीक नुकसानीच्या अनुषंगाने आवश्यक नोंदी आणि पंचनामे पूर्ण करून शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.






