स्थानिक पातळीवर रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करा – आमदार निलेश राणे

कुडाळच्या रोजगार मेळाव्यात १५५ उमेदवारांची उपस्थिती

९७ प्राथमिक तर १९ उमेदवारांची अंतिम निवड

बदलत्या रोजगार क्षेत्रातील गरजा लक्षात घेता युवकांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करून स्थानिक पातळीवर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ अंतर्गत राज्यभर ५०० हून अधिक ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ ठिकाणी हे मेळावे घेण्यात आले. त्यापैकी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.
मेळाव्याची सुरुवात शासनाच्या ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमाने झाली. यावेळी आमदार निलेश राणे, क. म. शि. प्र. मंडळाचे पदाधिकारी अरविंद शिरसाट, अनंत वैद्य, महेंद्र गवस, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, कौशल्य विकास विभागाचे विशेष कार्य अधिकारी सिद्धेश जगताप, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रतिभा चव्हाण, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी आयुक्त अमीन तडवी आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राणे यांनी युवकांनी कौशल्य विकासावर भर देण्याची गरज व्यक्त केली. सिंधुदुर्गातील अधिकाधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावे आयोजित करणे आवश्यक असून, शासनाने जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मेळाव्यात विविध कंपन्या व आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. एकूण ११ कंपन्या व आस्थापनांनी सहभाग घेतला असून, विविध क्षेत्रांतील ३६७ रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. मेळाव्यास १५५ उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी ९७ उमेदवारांची प्राथमिक निवड, तर १९ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी उपस्थित मान्यवर, कंपन्यांचे प्रतिनिधी, उमेदवार आणि आयोजकांचे आभार मानले. भविष्यातही महाविद्यालयाच्या माध्यमातून अशा रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी क. म. शि. प्र. मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे प्रभारी आयुक्त अमीन तडवी यांचे सहकार्य लाभले. मेळाव्याचे समन्वयक डॉ. साईनाथ लोखंडे, प्लेसमेंट सेलचे सदस्य तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम पाहिले.

error: Content is protected !!