नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

फिर्यादी सुनील धुरे यांच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
केंद्र सरकारमध्ये नोकरी लावते, असे आमिष दाखवून सुमारे १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी असलेली विनिता विवेक मुंज हिचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांनी फेटाळून लावला. सरकार पक्षातर्फे ॲड. आर. व्ही. देसाई व फिर्यादी सुनील धुरे यांच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसेच मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवें ऑफ इंडिया येथे नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून पाचजणांकडून प्रत्येकी २४ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात दाखल आहे. सुनील दामोदर धुरे (रा. कलमठ गावडेवाडी) यांच्या फिर्यादीनुसार विनिता विवेक मुंज, सुबत्ता माळी, (रा. कणकवली) आणि मनोजकुमार जैन (रा. वाशीम), भागवत यादव, उमेष घोष, जनकराम यादव व निरज श्रीवास्तव यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्हयातील आरोपी विनिता मुंज हिने अटकपूर्व जामीन मंजूर होण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
फिर्यादी घुरे यांची पत्नी आरोग्य खात्यात काम करत असल्याने, तिच्यासोबत काम करणारी विनिता मुंज हिने मुलांना केंद्र सरकारची नोकरी मिळण्याबाबत आपल्याकडे ओळखी आहेत, असे सांगून प्रत्येकी २४ लाख रुपये रोख घेतले होते. फिर्यादीची मुले सिद्धेश व माधुरी घुरे तसेच तन्बी म्हस्के व चैतन्य नाईक निकीता वळवी यांनी प्रत्येकी २४ लाख प्रमाणे १ कोटी २० लाख एवढी रक्कम विनिता मुंजमार्फत सुबत्ता माळीकडे दिली होती.
सुनावणीत एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक हा संगनमताने गुन्हा केला असून केंद्र शासनाच्या बनावट दस्तऐवज व सील वापरून ती खरी असल्याचे भासवले आहे, याबाबत तपास वत्ररायचा आहे. तक्रारदार व साक्षीदार यांना दिलेली बनावट सहीची कागदपत्रे आणि बोगस अपॉईंटमेंट लेटर दस्तऐवज कोठे आणि कोणी तयार केले, याचा तपास करायचा आहे. यासह अन्य मुद्दे उपस्थित करत, आरोपी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यासाठी युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायालयाने विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
कणकवली प्रतिनिधी






