प्रकल्पासाठी ज्यांनी आपली जमीन दिली, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे ही आमची जबाबदारी!

नरडवे प्रकल्पाचे आर्थिक पॅकेज तसेच हक्काचे भूखंड यांचे वाटप प्रसंगी पालक मंत्र्यांचे उद्गार
नरडवे धरणामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेज तसेच हक्काचे भूखंड यांचे वाटप करण्यात करण्याची संधी मला मिळाली. हे आर्थिक पॅकेज व भूखंड हे तुमच्या हक्काचे आहे. या प्रकल्पाला गती देण्याचे काम माझे राहील असे आश्वासन बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी बोलताना दिले. नरडवे धरणग्रस्तांना आर्थिक पॅकेज व भूखंड वाटपाचा शुभारंभ आज पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. नितेश राणे म्हणाले, “आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. प्रकल्पग्रस्तांना हक्काचे भूखंड मिळत असून हा क्षण सर्वांच्या सहकार्यामुळे साध्य झाला आहे. यापुढे या प्रकल्पाला गती देणे ही माझी जबाबदारी असेल. या प्रकल्पाची सुरुवात तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांच्या काळात झाली होती. या प्रकल्पासाठी ज्यांनी आपली जमीन दिली आहे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे ही आमची जबाबदारी आहे.”
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील, अधीक्षक अभियंता श्री. प्रभाकर पाटील, अप्पर जिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे, प्रांताधिकारी श्री. जगदीश कातकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री. शीतल जाधव, कार्यकारी अभियंता श्री. विनायक जाधव, तहसीलदार श्री. दीक्षांत देशपांडे आणि माजी जि.प. अध्यक्ष श्री. संदेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
नामदार नितेश राणे यांचा सत्कार यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने शाल श्रीफळ व देवीची प्रतिमा देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमात जयराम बापू ढवळ, विष्णू नामदेव ढवळ, श्रीधर सखाराम पालव, अनंत आपा ढवळ, प्रकाश धोडू ढवळ, लवू गणपत तेजम, अशोक एस. चव्हाण, संतोष शिवराम सावंत, आनंद विठ्ठल ढवळ, जॉन अँटोन डिसोजा आणि प्रभाकर यशवंत ढवळ या लाभार्थ्यांना भूखंडांचे वाटप व आर्थिक पॅकेज देण्यात आले करण्यात आले.यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व प्रकल्प धारक यांनी उपस्थिती लावली होती.





