खारेपाटण हायवे ब्रीज वरील दोन्ही लेन वाहतुकीसाठी केल्या खुल्या

अपघात होण्याची दाट शक्यता

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण शुक नदीवरील ब्रीजची एक लेन अपघाताच्या संभाव्य धोक्यामुळे व सर्व्हिस रोड अपूर्ण असल्याच्या कारणास्तव गेले अनेक महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होता. आज रविवारी अखेर या ब्रीज वरील दोन्ही लेन अचानकपणे महामार्गावरील वाहतुकीसाठी खुल्या केल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम पसरला असून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.तर या महामार्गावरून आता भरधाव वेगाने वाहने धावत असून याठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, मुंबई – गोवा राष्ट्रीय माहामार्ग क्र.६६ वरील खारेपाटण मधुबन हॉटेल ते खारेपाटण पोलिस चेक पोस्ट या दरम्यान शुकनदीवर असलेल्या ब्रिजवर ब्रिजच्या दोन्ही साईट ने अवघड वळणे असल्याने तसेच रस्त्याचा दोन्ही बाजूला सर्विस रोड नसल्याने याबरोबरच बाजूला नागरी वस्ती असल्याने व पदचारी वर्गाला चालायला पुरेसा रस्ता नसल्याने वाहन चालकाकडून बरेच छोटे मोठे सुमारे ६५ पेक्षा अधिक अपघात येथे झालेले आहेत. तर या अपघातामध्ये काही व्यक्तीचा मृत्यू देखील झालेला आहे. या अपघातासाठी फक्त वाहनचालकाना दोष देऊन चालणार नाही.तर महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग हे याला पूर्णतः जबाबदार आहे. असा तीव्र निषेध ग्रामस्थांकडून होत आहे.
त्याचे कारण म्हणजे चिंचवली गाव व खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन कडून येणारा रस्ता थेट महामार्गावर ब्रीज वर येऊन मिळतो. तसेच कोल्हापूर भुईबावडा – खारेपाटण हा राज्यमार्ग देखील हॉटेल मधुबन जवळून थेट खारेपाटण महामार्गावर ब्रीज वर येत असल्यामुळे वाहनचालकांना मोठी सावधगिरी बाळगून वाहन चालवावे लागत आहे. एवढा “डेंजर झोन पॉईंट ” खारेपाटण ब्रिजवर असताना येथील ब्रिजवरोल दोन्ही लेन पुन्हा सुरू करणे म्हणजे अपघाताला पुन्हा निमंत्रण देण्यासारखेच आहे.
मुळात खारेपाटण येथील गावातून जाणाऱ्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाला आवश्यक असलेले कोणतेही सर्विस रोड पूर्ण बनवलेले नाहीत. आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना फलक लावलेले नाहीत. तसेच शहराच्या ठिकाणी वाहनाची गती रोखण्यासाठी आवश्यक रंबलर गती रोधक उभारलेले नाहीत. त्यामुळे मुळात सर्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गाची अपूर्ण राहिलेली कामे आधी तातडीने पूर्ण करणे गरजेची असून त्या नंतरच रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे आवश्यक आहे. या सर्व घटनेसंदर्भात खारेपाटण सरपंच यांनी सांगितले आहे की, खारेपाटण मध्ये चार दिवसापूर्वी आलेल्या पुरपरिस्थिती मुळे शुकनदी च्या पाण्याने ने धोक्याची पातळी ओलांडली होती त्यामुळे अश्या परिस्थितीत जुन्या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक असल्याने ती वाहतूक नवीन ब्रिज वरून करण्यात आली होती… तसेच खारेपाटण ग्रामपंचायत कडून संबंधित अधिकाऱ्यांना नवीन ब्रिज तसेच हायवे येथील असणारी अपुरी कामे गणेशचतुर्थी पूर्वी करून द्यावीत असे सांगण्यात आले आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी रम्बलर गती रोधक घालण्यात यावेत व ब्रिज तसेच हायवे महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित निर्धोक करून द्यावा असेही सरपंच प्राची इस्वलकर यांनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!