भरणी प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य आणि रोख बक्षीस वाटपाचा उपक्रम

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या भरणी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि वेदशास्त्र संपन्न स्व. सदाशिव साळस्कर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साळस्कर कुटुंबीयांकडून रोख रक्कमेच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि गवंडी कामगार यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या कार्यक्रम प्रसंगी गावचे सरपंच अनिल बागवे, पंचायत समितीचे माजी सदस्य गणेश तांबे, सामाजिक कार्यकर्ते विवेक ताम्हणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश बागवे, उपाध्यक्ष स्नेहा घाडीगांवकर, उपसरपंच प्रशांत घाडीगांवकर, मुख्याध्यापक काशिनाथ तु. कळसुलकर, शिक्षक लक्ष्मण राणे, राजन रासम, आराधना रासम, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जगताप, वैदेही पुजारे, मनीषा तांबे, तसेच गवंडी कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष पवार आणि सुवर्णा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना सरपंच अनिल बागवे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. गवंडी कामगारांनी शाळेसाठी दिलेले योगदान मोलाचे असून असे सहकार्य भविष्यातही अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
पंचायत समितीचे माजी सदस्य गणेश तांबे यांनी शाळेसाठी आजवर दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून येणाऱ्या काळातही शाळेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.
सामाजिक कार्यकर्ते विवेक ताम्हणकर यांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी वाचन वर्ग आणि लघुवाचनालय सुरू करण्याची गरज व्यक्त केली. पुढील शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबवण्याचे त्यांनी सुचवले.
शैक्षणिक साहित्य व बक्षिसांचे वितरण माजी विद्यार्थी विवेक ताम्हणकर, अशोक घाडीगावकर (जिल्हा उपाध्यक्ष, गवंडी कामगार संघटना), सरपंच अनिल बागवे, उपसरपंच प्रशांत घाडीगांवकर, पोलीस पाटील आनंद ताम्हणकर, प्राची साळसकर, स्वप्नील भरणकर, चंद्रकांत घोडगेकर, दीपक पवार, अक्षय चिंचवलकर, रुपेश जगताप, संजय ठुकरूल आणि प्रवीण शिवाजी जगताप यांच्या भरीव सहकार्याने पार पडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजन रासम यांनी केले तर आभार शिक्षक लक्ष्मण राणे यांनी मानले.





