भ्रष्ट आचरणापासून दूर राहून आयुष्य यशस्वी करा – विजय पांचाळ

संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये एसीबीचा जनजागृती कार्यक्रम

भ्रष्ट आचरणापासून दूर राहून आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी करा, असा संदेश सिंधुदुर्ग जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक श्री.विजय पांचाळ यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिला. कोणी लाच मागत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क करा असे आवाहन त्यानी यावेळी केले. संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व संत राऊळ महाराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विजय पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भ्रष्ट आचरणापासून दूर राहून आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी करण्याचा संदेश त्यांनी दिला. पालकांकडे काम करून घेण्यासाठी कोणी लाच मागत असल्यास आपणास संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यासाठी त्यांनी आपला दूरध्वनी क्रमांक सुद्धा दिला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुर्वे होत्या. भविष्यात कोणत्याही पदावर विराजमान झाल्यावर लाच घेणार नाही असे ठाम मत बनवण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले. तसेच त्यामुळे कोणी लाच देणार नाही व समाजातून लाच आपोआपच गायब होईल असा आशावाद व्यक्त केला. मान्यवरांचे स्वागत, सूत्रसंचालन, आभार या बाजू कॅप्टन डॉ.एस.टी. आवटे यांनी सांभाळल्या. हवालदार अजित खंडे, महिला पोलीस निशा रणखंबे व महाविद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!