तरुणांना वाचते करा – पालकमंत्री रवींद्र चव्हाण
कुडाळ मध्ये सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२ चा शुभारंभ
निलेश जोशी । कुडाळ : तरुणांना वाचन संस्कृतीकडे वाळविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तरुण पिढी वाचती झाली तर वाचन संस्कृती टीकेल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. कुडाळ येथे आयोजन सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२ च्या उदघाटन प्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते.
उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथ संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत आयोजित सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२ ला आज कुडाळ येथे सुरुवात झाली. २७ आणि २८ मार्च या दोन दिवशी हा ग्रंथोत्सव कुडाळमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सकाळी कुडाळ येथील रा ब अनंत शिवाजी देसाई तथा टोपीवाला वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालय येथून ग्रंथदिंडीने या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. नगराध्यक्ष आफरीन करोल यांच्या हस्ते या ग्रंथ दिंडीचा शुभारंभ झाला. या ग्रंथ दिंडीमध्ये कुडाळ हायस्कुल ज्युनियर कॉलेज, बॅ नाथ पै विद्यालय, आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी पारंपरिक वेषभूषेमध्ये सहभागी झाले होते. वाचनालय ते महालक्ष्मी हॉल पर्यंत कुडाळ बाजार पेठ मार्गे ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीमध्ये अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
त्यांनतर महालक्ष्मी हॉल येथे ग्रंथप्रदार्शन आणि विक्रीचे उदघाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते फित कापून झाले. यावेळी सर्व मान्यवरांनी ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी केली. त्यानंतर या ग्रंथोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झालं. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, सीईओ प्रजीत नायर, नगराध्यक्ष आफ़्रिन करोल, कोमसाप चे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा ग्रंथालय अध्यक्ष अनंत वैद्य, ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, अमरसेन सावंत, संजय आंग्रे, श्री. पवार, तहसीलदार अमोल पाठक, गट विकास अधिकारी विजय चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले, सिंधुदुर्गात असलेली १२८ ग्रंथालये हे सिंधुदुर्गचे वैभव आहे. अशा या परम वैभवसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रंथालय चळवळीत सहभागी होणाऱ्या सर्वांचं कौतुक आहे. या चळवळीमध्ये प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. ग्रंथालय चळवळीतील कर्मचाऱ्यांना कमी मानधन मिळते ही वस्तुस्थिती आहे. या ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी आणि त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी येत्या जूनच्या अगोदर ग्रंथालय चळवळीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यात येईल. त्यामुळे या संदर्भात काय मार्ग काढता येईल यावर चर्चा करू असे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिले. ग्रंथदिंडीमध्ये शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले ते त्यांच्या मनाने सहभागी झाले होते का हे पाहणं खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वाचनाची आवड करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. वाचाल तर वाचाल असं जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी आपल्या भाषणातून सांगितलं ते योग्यच आहे. कथाकथन, काव्य संमेलन यांची प्रशिक्षणे झाली पाहिजेत. यामध्ये नवीन पिढी तयार झाली पाहिजे. हे कार्यक्रम तरुण पिढीसमोर झाले पाहिजेत तरच वाचन संस्कृती वाढेल, असं श्री चव्हाण म्हणाले. खूप पुस्तक वाचा. पुस्तक विकत घेऊन वाचा. पुस्तकांचा संग्रह वाढवा. पुस्तकांचे आदान प्रदान करा, त्यामुळे ज्ञानाची व्याप्ती वाढते आणि पुस्तक देखील सहज उपलब्ध होतात असे देखील पालकमंत्री रवीन्द्र चव्हाण यांनी यावेळी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यत ज्यावेळी १५० वर्षांची परंपरा असलेली ग्रंथालये पाहतो त्यावेळी या जिल्ह्यात ग्रंथ चळवळ किती रुजलेली आहे याची जाणीव होते. आजकाल ग्रंथालय चळवळ चालविणे खूप कठीण झाले आहे. अत्यंत अल्प मानधनावर ग्रंथालय कर्मचारी काम करत आहेत. ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कारण्याच्ये काम पालकमंत्री करतील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना वैभव नाईक म्हणाले, या जिल्ह्यात १५० वर्षांची परंपरा असलेली वाचनालये आहेत. तरी देखील इथल्या ग्रंथालय कार्यक्रर्यांना ग्रंथालय चळवळ जीवंत ठेवण्याची धडपड करावी लागत आहे हे दुर्दैव आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे या ग्रंथालय चळवळीसाठी आशेचा किरण आहेत त्यामुळे त्यांचे प्रश्न पालकमंत्र्यांनी सोडवावेत अशी मागणी आमदार वैभव नाईक यानी यावेळी केली.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी देखील यावेळी आपले विचार मांडले. स्पर्धा परीक्षांत यशस्वी होण्यासाठी वाचन अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातल्या आठ तालुका वाचनालयासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ई वाचनालयासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी दिली. यावेळी ग्रंथालय संघाचे कोकण विभागाचे अध्यक्ष मंगेश मसाके यांनी ग्रंथालय कमर्चाऱ्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्याची मागणी केली.
उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले तर स्वागत आणि प्रास्ताविक सचिन हजारे यांनी केलं. आभार जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांनी मानले. दुपारच्या सत्रात समान साहित्यिकीयांचे हा कार्यक्रम झाला. यामध्ये वृंदा कांबळी यांनी शांत शेळके, भारत गावडे यांनी अण्णाभाऊ साठे तर डॉ. शरयू आसोलकर यांनी शंकर रमाणी यांच्या विषयी विवेचन केले. या संपूर्ण कार्यक्रमाला ग्रंथालय चळवळीतील अनेक कार्यकर्ते, ग्रंथालय कर्मचारी आणि नागिरक उपस्थित होते. उद्या या सिंधुदुर्ग ग्रंथोत्सवाचे सांगता होणार आहे.
पत्रकार दिन शासकीय सोहळा म्हणून साजरा करा – पालकमंत्री
दरवर्षी साजरा होणार ६ जानेवारी हा पत्रकार दिन शासनाचा कार्यक्रम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा करावा, अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी के. मंजुलक्ष्मी याना दिल्या. भविष्यात कोणीही पालकमंत्री असू दे मात्र दरवर्षी हा कार्यक्रम शासनाने साजरा करावा असे देखील श्री. चव्हाण यांनी सांगितले. यासाठी जिल्हा नियोजन मधून १० लाखाच्या निधीची तरतूद करावी असे देखील श्री. चव्हाण म्हणाले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.