अतुल रावराणे यांनी आपली लायकी ओळखावी
आमदार नितेश राणे यांची खोचक टीका
कमिशन एजंट असल्याचा देखील केला आरोप
ठाकरे सेनेत स्वतःचे अस्तित्व घालवून बसलेल्या अतुल रावराणे यांनी प्रथम पक्षात स्वतःची पत निर्माण करावी. त्यानंतरच आमचे वर भाष्य करावे. तुम्ही करत असलेल्या सामाजिक कार्याची पक्ष तरी दखल घेतो आहे का याचा विचार करावा.आम्ही उद्योजक आहोत. तुमच्या सारखे कमिशन एजंट नाही.अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेचे सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे यांच्यावर केली.
देवगड येथे अतुल रावराणे यांनी केलेल्या टीकेचा आमदार नितेश राणे यांनी प्रसिध्दी पत्रातून समाचार घेतला.ते म्हणाले,जिल्हाप्रमुख बनून जिल्ह्याची सूत्रे हाती घेण्याची स्वप्न पाहणारे तुम्ही. खासदार विनायक राऊत यांचे खास असतांनाही तुमची सह संपर्कप्रमुख पदावर बोळवण करण्यात आली यापेक्षा दुसरे वाईट काय असणार ? यातूनच आपली स्वतःची लायकी ओळखावी आणि आमच्यावर टीका करावी.
देवगड येथील शेतकऱ्यांचे दुःख पुसण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी तुम्हाला पाठवले असे तुम्ही सांगता याचा अर्थ नव्याने मतदार संघ निहाय जिल्हाप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या त्या जिल्हाप्रमुखांचे काही अस्तित्वात राहिले नाही हे सिद्ध होते.
विकासाच्या बाबतीत ठाकरे सरकार होते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी कणकवली देवगड आणि वैभववाडी या माझ्या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांवर फार मोठा अन्याय केला. मी दिलेली विकास कामे रद्द केली.जिल्हा नियोजन मधील कामे वगळण्यात आली मात्र शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेवर येताच दोन हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघात विकासासाठी आणला. त्याचप्रमाणे पंतप्रधान सडक आणि जलजीवन योजनेअंतर्गत स्वतंत्र निधी आणलेला आहे.त्यामुळे तुमची सत्ता असताना आणि आमची सत्ता असताना विकास कसा होतोय याचा फरक अतुल रावराणे यांनी उघड्या डोळ्यांनी पाहावा.
राणे कुटुंब हे व्यावसायिक आहेत. आम्ही उद्योजक म्हणूनच काम करतो कमिशन एजंट नाही. ठाकरे सेनेत प्रत्येक नेता कमिशन एजंट आहे. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी प्रसिध्दी पत्रातून केली.
दिगंबर वालावलकर कणकवली