सुप्रसिद्ध दशावतारी स्त्री कलाकार प्रशांत मेस्त्री यांचे निधन

विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू

दशावतारी नाट्य संघटनेच्या माध्यमातून कलाकारांना एकवटण्याचे केले होते काम

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध दशावतारी स्त्री कलाकार प्रशांत रामचंद्र मेस्त्री हरकुळ खुर्द _ सुतारवाडी यांचे घरी विजेचा धक्का लागल्याने निधन झाले. आज दुपारच्या सुमारास ते घरी गाडी सर्विसिंग करण्याकरता आणलेल्या मशीनने काम करत असतानाच त्यांना विजेचा धक्का लागून त्यांचे जागीच निधन झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तत्पूर्वीत त्यांचे निधन झाले होते. दशावतारी कलेमध्ये स्त्री अभिनयामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला होता. कणकवली देवगड वैभववाडी दशावतारी नाट्य संघटनेच्या अध्यक्षपदी ते सध्या कार्यरत होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुले असा परिवार आहे. प्रशांत मेस्त्री हे स्त्री अभिनयामध्ये उत्कृष्ट भूमिका करत. त्यांच्या स्त्री अभिनयाने दशावतारी नाट्यकलेमध्ये त्यांची एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक दशावतार नाट्य कंपनीमध्ये त्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटवला होता. नाट्य कलाकार संघटनेच्या माध्यमातून दशावतारी कलाकारांची संघटना वाढवण्यावर त्यांनी भर दिला होता. त्यांच्या उपस्थितीत आज कुडाळ येथे होणाऱ्या लाजरी क्रिकेट ग्रुप मान्सून महोत्सवातील संयुक्त दशावतारी नाटक रद्द करण्यात आले आहे. त्यांच्यावर उद्या सकाळी 9.30 वाजता हरकुळ खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!