दोन शासकीय कर्मचाऱ्यांच्या एकाच नंबरच्या कार मुळे कणकवलीत खळबळ

बनावट नंबर प्लेट व विना पासिंग गाडी रस्त्यावर आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल होणार
कणकवली शहरामध्ये एकाच नंबरच्या दोन वॅगनार कार आढळून आल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत जागरूक नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर कणकवली पोलिसांनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास सदरच्या दोन्ही वॅगनार कार ताब्यात घेतल्या होत्या. दरम्यान यातील कार मालकावर पासिंग केल्याशिवाय कार रस्त्यावर चालवणे व बनावट नंबर प्लेट वापरणे याप्रकरणी दंडात्मक कारवाई केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनी दिली.
या दोन्ही वेगनर कारचा नंबर एम एच ०७ एजी८५३३ असा आहे सदर कार सत्यवान भगवान माळवे (42, रा. कणकवली) व विनोद विठ्ठल खंडागळे (४०, रा. नाधवडे – वैभववाडी) यांच्या ताब्यात होत्या, अशी माहिती कणकवली पोलिसांनी दिली. सत्यवान माळवे महसुल कर्मचारी असून विनोद खंडागळे प्राथमिक शिक्षक असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
एकाच नंबरच्या दोन वेगनर कशा याविषयी कणकवली शहरातील चर्चा सुरू आहे. दरम्यान कणकवली पोलिसांनी आरटीओ विभागाशी संपर्क साधला आहे. याबाबत चौकशी आरटीओ विभाग करणार असून त्यानंतर गौडबंगाल उलगडणार आहे. आरटीओच्या चौकशीअंती खोट्या नंबरने वावरणाऱ्या कारमालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे कणकवली पोलिसांनी सांगितले.
दिगंबर वालावलकर कणकवली