कळसुली येथील शामसुंदर दळवी यांचे अपघाती निधन

कणकवली शहरातील उड्डाण पुलावर ट्रक ची दुचाकी ला जोरदार धडक

कणकवली शहरातील उड्डाणपुलावर जानवली वरून गोव्याच्या दिशेने रस्त्याच्या विरुद्ध बाजूने जात असताना कळसुली येथील शामसुंदर नाना दळवी (वय. 58) यांना ट्रकची जोरदार धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वी त्यांचे निधन झाले. या अपघातानंतर मालवाहक ट्रक चालकाने महामार्गावरून जात असलेल्या एका कारला थांबवून 108 नंबरला फोन केला व 108 रुग्णवाहिकेने त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतु त्यांना ट्रक ची धडक एवढी जोरदार बसली होती की यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कणकवली पोलीस भूषण सुतार यांच्यासह अन्य पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भाजपाचे कळसुली येथील पदाधिकारी असलेले शामसुंदर दळवी हे जाणवली पुलावरून गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या लेन वरून गोव्याच्या दिशेने आपल्या घरी कळसुली येथे निघाले होते. तर ट्रक हा मुंबईच्या दिशेने जात होता. या ट्रक चालकाने पोलिसाला दिलेल्या माहितीनुसार कणकवली डीपी रोडच्या दरम्यान उड्डाण पुलावर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने दुचाकी ने जात असलेले दळवी हे या वळणादरम्यान ट्रकच्या समोर वेगाने येऊन ट्रक वर धडकले अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, कळसुलीचे सरपंच सचिन पारधीये आदींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. श्यामसुंदर दळवी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. कणकवली पंचायत समितीच्या माजी उप सभापती सुचिता दळवी यांचे ते पती होत.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!