गावाच्या विकासासाठी पोटतिडकीने प्रश्न मांडणाऱ्यांमुळेच यश मिळते

तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांचे प्रतिपादन
असलदे गावात श्रीकृष्ण मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न
“गावाच्या प्रश्नांसाठी पोटतिडकीने प्रश्न मांडणारी माणसे असल्यानेच ते मार्गी लागत असतात,” असे प्रतिपादन तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी असलदे गावठण येथे श्रीकृष्ण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यात केले. गावातील तलाठी कार्यालयासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या पत्रकार भगवान लोके व सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या प्रयत्नातूनच गावाला स्वतंत्र तलाठी मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील पुरात वाहून गेलेल्या धाकू मयेकर यांच्या शोध मोहिमेत भगवान लोके यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांच्या सक्रियतेमुळे एनडीआरएफ पथक गावात दाखल झाले आणि शोधमोहीम यशस्वी झाली. श्रीकृष्ण मंदिर एकात्मतेचे प्रतिक असून अशा धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमुळे गावात एकजूट निर्माण होते, असेही देशपांडे म्हणाले.
हा कार्यक्रम असलदे गावठण ग्रामविकास मंडळ मुंबई व गावठण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बळीराम (आबा) परब यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यधाम सभागृहात पार पडला.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, सरपंच चंद्रकांत डामरे, मंडल अधिकारी दिलीप पाटील, उपसरपंच सचिन परब, माजी सरपंच सुरेश लोके, मंडळ अध्यक्ष संदीप शिंदे, तसेच ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसिलदार देशपांडे व पत्रकार संघ अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
श्रीकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण:
१२ मे ते १५ मे २०२५ दरम्यान धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मूर्ती मिरवणूक, हवन, महाप्रसाद, भजन, सत्यनारायण पूजन, हळदीकुंकू समारंभ, व शक्तीतुरा कार्यक्रम अशा विविध उपक्रमांतून हा कार्यक्रम झाला.